नाशिक – केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर डॉ. भारती पवार या प्रथमच नाशिक दौऱ्यावर येणार आहेत. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व नवीन मंत्र्यांना जन आशिर्वाद यात्रा करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार डॉ. पवार या उत्तर महाराष्ट्रात ही यात्रा करणार आहेत. त्यामुळे त्यांच्या दौऱ्यात भरगच्च कार्यक्रमांचा समावेश आहे.
डॉ. भारती पवार यांची जन आशिर्वाद यात्रा ही १६ ते २० ऑगस्ट दरम्यान असणार आहे. पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यातील ५ लोकसभा मतदारसंघात ४३१ किलोमीटर एवढा प्रवास करणार आहेत. या यात्रेत त्या समाजाच्या विविध घटकांचे प्रश्न जाणून घेतील. तसेच केंद्र सरकारच्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांशीही संवाद साधतील. डॉ. पवार यांचे सोमवारी (१६ ऑगस्ट) सकाळी ७ वाजेच्या सुमारास मोखाडा (पालघर) येथे आगमन होईल. येथून त्या त्र्यंबकेश्वर येथे येतील. तेथे त्या भगवान त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेतीत. त्यानंतर त्र्यंबकमधील विविध साधू, संतांशी त्या संवाद साधतील. तेथून त्या नाशिकला येतील. रात्रीच्या भोजनानंतर संघ परिवाराच्या सदस्यांशी चर्चा त्या करतील. मंगळवारी (१७ ऑगस्ट) सकाळी त्या दहावा मैल, ओझर, पिंपळगाव, वडाळीभोई, मंगरुळ फाटा येथे विविध कार्यक्रमांना हजेरी लावून शेतकऱ्यांशी संवाद साधतील. दुपारी त्या चांदवड येथे लसीकरण केंद्राला भेट देऊन विविध क्षेत्रातील मान्यवरांशी चर्चा करतील. त्यानंतर उमराणे, सौंदाणे, टेहरे, मालेगाव येथील कांदा उत्पादक आणि शेतकऱ्यांच्या अडी-अडचणी त्या समजून घेतील. बुधवारी (१८ ऑगस्ट) सकाळी ते मालेगाव मधील भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याशी चर्चा करतील. कोरोना योद्ध्यांचा सन्मान करुन विविध क्षेत्रातील व्यक्तींसोबत त्या संवाद साधतील. त्यानंतर नामपूर, तहाबाराद, पिंपळनेर, साक्री मार्गे त्या धुळे जिल्ह्यातील विविध गावांना आणि कार्यक्रमांना हजेरी लावतील. शेवटच्या टप्प्यात त्या नंदुरबार जिल्ह्यातील विविध गावांना भेट देतील. तेथील विविध व्यक्ती, पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्याशी चर्चा करतील.