नाशिक – जिल्ह्यातील तरुणांना शिक्षण, प्रशिक्षण आणि रोजगार मिळावा यासाठी सिपेट प्रकल्प आता नाशिकलाच होणार आहे. सिपेट प्रकल्पाला राज्य शासनाने मान्यता दिली आहे. यामुळे जागेअभावी रद्द झालेल्या पनवेल येथील प्रस्तावित प्रकल्प आता नाशिक येथेच होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रकल्पाविषयीची राज्य प्रशासनाची सर्व प्रक्रिया पूर्ण झाली असून लवकरच प्रत्यक्ष प्रकल्प उभारण्याच्या कामाला प्रारंभ होणार आहे. या प्रकल्पामुळे दरवर्षी दोन हजार तरुणांना शिक्षण, प्रशिक्षण आणि रोजगार उपलब्ध होणार असल्याची माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी दिली आहे.
केंद्र शासनाने पनवेल येथे सिपेट प्रकल्प मंजूर केलेला होता.या प्रकल्पासाठी सुमारे पंधरा एकर जागेची गरज होती.दीड वर्षे उलटूनही सिपेट प्रकल्पाच्या उभारणीसाठी पनवेल येथे जागा उपलब्ध न झाल्याने प्रकल्प रद्द होण्याच्या मार्गावर होता. याची माहिती खा. हेमंत गोडसे यांना मिळताच त्यांनी पनवेल येथील प्रकल्प राज्याबाहेर न जाता नाशिकला आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. गोडसे यांनी सिपेटचे प्रमुख झा यांची दिल्लीत भेट घेत पनवेल येथील मंजूर प्रकल्प इतरत्र जाण्याऐवजी सदर प्रकल्प राज्यातील नाशिक येथेच व्हावा, प्रकल्पासाठी जागा तातडीने उपलब्ध करून देऊ असे स्पष्ट करत गोडसे यांनी जिल्ह्यातील तरूणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी सिपेट प्रकल्पाची नाशिकला किती गरज आहे याची सविस्तर माहिती मंत्रालयातील सिपेटच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना दिली.सिपेट नाशिकलाच व्हावे यासाठी गोडसे यांनी दिल्ली दरबारी जोरदार प्रयत्न सुरू ठेवले होते. गोडसे यांची मागणी न्यायिक असल्याने काही महिन्यांपूर्वी केंद्राने सिपेटच्या नाशिक येथील प्रकल्पाला तत्वतः मान्यता दिली होती.
प्रकल्पाला लागणारी जागा,राज्य शासनाची मान्यता आणि त्यासाठीचा निधी या विषयांचा गुंता प्रत्यक्ष सोडविणे गोडसे यांच्या समोर मोठे आव्हान होते. केंद्राच्या पथकाला नाशिकला पाचारण करुन गोवर्धन शिवारातील जागेची निश्चिती चार महिन्यांपूर्वी करून घेतली होती.राज्य शासनाकडे सततचा पाठपुरावा करून निधीचा विषय मार्गी लावला.या प्रकल्पासाठी चाळीस ते पंचेचाळीस कोटी रुपयांचा निधी लागणार असून राज्य आणि केंद्र शासनाने पन्नास, पन्नास टक्के निधी देण्याचे तत्वतः मान्य केले होते.
जागा,निधी आणि मान्यता हे तीनही मुद्दे एकत्रितपणे सोडविण्यासाठी गोडसे यांच्या आग्रही मागणीनुसार नुकतीच राज्याचे सेक्रेटरी सिताराम कुंटे यांच्या दालनात त्यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष बैठक घेण्यात आली.या बैठकीत नासिक येथील गोवर्धन शिवारात सिपेट प्रकल्प उभारण्याच्या प्रस्तावास मान्यता देण्यात आली असून प्रकल्प उभारणीकामी लागणाऱ्या निधीपैकी पन्नास टक्के निधी राज्य शासन उपलब्ध करून देण्याच्या निर्णयावर बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.
पुढील आठवड्यात याविषयीचा सविस्तर अहवाल पुढील कार्यवाही केंद्राकडे सादर करण्यात येणार असल्याची माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी दिली आहे. ऐन दिवाळीत राज्य शासनाने सिपेट प्रकल्पाला मान्यता देऊन नाशिककरांना दीपावलीची भेटच दिली असल्याची प्रतिक्रिया खासदार हेमंत गोडसे यांनी व्यक्त केली आहे.