विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
संपूर्ण देशात कोरोनाच्या रुग्णांची संख्या घटली आहे. मृत्यूचा आकडाही थोडोफार कमी झाला आहे. पण, याचा अर्थ गाफील राहण्याची गरज नाही. उलट कोरोनाचा समूळ नायनाट करण्यासाठी ३० जूनपर्यंत जाहीर झालेल्या दिशा–निर्देशांचे पालन करा, अशा सूचना केंद्रीय गृहमंत्रालयाने सर्व राज्यांना आणि केंद्रशासित प्रदेशांना दिल्या आहेत.
केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला यांनी म्हटले आहे की, ‘कोरोनाचे संक्रमण रोखणे आणि त्यासाठी आवश्यक उपायांची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. दक्षिण आणि उत्तरपूर्वेकडील काही भाग सोडून सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये सक्रीय रुग्णांमध्ये घट झाली आहे. मात्र रुग्णसंख्या घटलेली असली तरीही अद्याप देशात मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण आहेत. त्यामुळे नियमांचे कठोर पालन आवश्यक आहे.’
त्या त्या भागांमध्ये नियमांमधून दिलासा, आवश्यकता आणि संसाधनांचे आकलन करून योग्य वेळी नियोजनबद्ध विचार केला जाऊ शकतो. सध्या तरी मे महिन्याप्रमाणेच सर्व नियम ३० जूनपर्यंत कायम राहणार आहेत, असेही ते म्हणाले.
क्वारंटाईनसाठी सोयी-सुविधा, पुरेसे ऑक्सिजन, आयसीयू बेड, व्हेंटिलेटर, अँब्युलन्स आदींवर लक्ष केंद्रीत करण्याच्या सूचना देण्याच आल्या आहेत. अर्थात एकच दिलासा या आदेशांमध्ये आहे आणि तो अत्यंत महत्त्वाचा आहे की देशात पुन्हा लॉकडाऊन करण्याबाबत सरकारने कुठलेही संकेत दिलेले नाहीत.
उलट आता ऑक्सिजनची उपलब्धता आणि आयसीयू खाटांची व्यवस्था याचे नियोजन करण्यावर जोर देण्याबाबत सांगितले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, भारतातील संक्रमण २ लाख ११ हजार २९८ ने वाढले आहे. आता २ कोटी ७३ लाख ६९ हजार ९३ लोक संक्रमित आहेत. तर बरे होण्याचे प्रमाण ९० टक्क्यांपर्यंत वाढलेले आहे.