विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
कोरोना प्रतिबंधक लसीचे वाढते उत्पादन पाहता केंद्र सरकारने सोमवारी मोठी घोषणा केली आहे. आतापर्यंत ऑनलाईन नोंदणी आणि त्यानंतर स्लॉट बुकींगसाठी वैतागलेल्या नागरिकांसाठी मोठी दिलासादायक बातमी आहे. यापुढे १८ ते ४४ या वयोगटासाठी ऑनलाईन नोंदणी सक्तीची राहणार नाही, असे केंद्र सरकारने जाहिर केले आहे. त्यामुळे या वयोगटातील नागरिकांना थेट लसीकरण केंद्रात जाऊन लस घेता येणार आहे. याचा मोठा परिणाम लसीकरण मोहिमेवर होणार आहे.
सद्यस्थितीत कोरोना लसीकरणासाठी कोविन या वेबसाईट किंवा अॅपवर ऑनलाईन नोंदणी करावी लागते. त्यानंतर लस घेण्यासाठी स्लॉट बुक करावा लागतो. सध्या लसीचा मोठा तुटवडा असल्याने स्लॉट बुकींग मिळत नाही काही सेकंदातच स्लॉट बुक होत असल्याने देशभरात याविषयी प्रचंड नाराजी आहे. तसेच, १८ ते ४४ वयोगटातील नागरिकच खऱ्या अर्थाने नेट सॅव्ही असल्याने त्यांनाच या गैरसोयीला तोंड द्यावे लागत आहे. अखेर याची दखल केंद्र सरकारने घेतली आहे. कोरोना लसींच्या उत्पादनाला आता वेग आला असून नजिकच्या काळातच देशात मुबलक प्रमाणात लस उपलब्ध होणार आहे. ही लस वाया जाऊ नये यासाठी ऑनलाईन नोंदणीचा पर्याय काढून टाकण्यात आला आहे. आणि ऑफलाईनरित्या म्हणजेच थेट केंद्रात जाऊन लस घेण्याची मुभा देण्यात आली आहे. ज्यांनी कोविन अॅपवर नोंदणी केली आहे त्यांना तत्काळ लस उपलब्ध होणार आहे. म्हणजेच, केवळ ऑनलाईन नोंदणी आणि त्यानंतर केंद्रावर थेट लस असा हा नवा नियम आहे. स्लॉट बुकींगच्या जाचातून आरोग्य मंत्रालयाने नागरिकांना मुक्ती दिली आहे. तसेच, केवळ सरकारी लसीकरण केंद्रातच या सुविधेचा लाभ घेता येणार असल्याचे आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
https://twitter.com/ians_india/status/1396775734383808519