विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
पश्चिम बंगालमधील चक्रीवादळाचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेत आयोजित बैठकीला दांडी मारून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी प्रोटोकॉल मोडला आहे, असा आरोप केंद्राने केला आहे.
केंद्रातील सूत्रांनी सांगितले की मुख्य सचिव आलापन बंडोपाध्याय यांच्यावरून उद्भवलेल्या वादातही ममता बॅनर्जी दिशाभूल करीत आहेत. गेल्या आठवड्यात पंतप्रधान कलाईकुंडा येथे दाखल झाल्यावर ममता यांनी दोन मिनीटांची भेट घेतली आणि दीघाच्या दिशेने रवाना झाल्या. त्यांनी चक्रीवादळाशी संबंधित आढावा बैठकीत भाग घेतला नव्हता.
ममता यांनी दावा केला आहे की त्यांनी जाण्यापूर्वी पंतप्रधानांची परवानगी घेतली होती. मात्र केंद्रातील सूत्रांनी अश्याप्रकारची कुठलीही परवानगी ममता यांनी घेतली नाही, असे म्हटले आहे.
ममता बॅनर्जी यांनी बैठकीत सहभागी होण्याची सहमती दिलेली होती. मात्र विरोधीपक्षनेते शुभेंदू अधिकारी बैठकीत राहणार आहेत, हे कळल्यावर त्यांनी विचार बदलला. ममता यांनी पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रात हे मान्य देखील केले आहे.
मुख्यमंत्र्यांनी इतर अधिकाऱ्यांनाही बैठकीत सहभागी होण्यापासून रोखले होते, त्यामुळे पंतप्रधानांना आढावा बैठक रद्द करावी लागली होती. बैठक संपेपर्यंत आपल्याला वाट बघावी लागेल, याचा अंदाज आल्यामुळेच ममतांनी असे केले, असेही केंद्राने म्हटले आहे.
विरोध संवैधानिक
मुख्य सचिव बंडोपाध्याय यांच्या बदलीबाबतच्या निर्णयाला ममता बॅनर्जी यांचा विरोध पूर्णपणे असंवैधानिक आहे, असे केंद्र सरकारने म्हटल आहे. बंडोपाध्याय यांची सेवा केंद्राच्या अख्त्यारित येत असल्यामुळे त्यांचे स्थानांतरण केंद्राचाच अधिकार आहे.
मुख्य सचिवांना आपल्या कर्तव्यांशी फारकत घेऊन पंतप्रधानांपुढे कुठलेही प्रेझेंटेशन दिले नाही. केंद्र सरकारच्या आदेशांचे पालन करण्यास नकार देणे हे नियमांचे उल्लंघन होय, असेही सूत्रांनी म्हटले आहे.