विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
देशभरातील ज्येष्ठ नागरिकांसाठी केंद्र सरकारने विशेष टोल फ्री हेल्पलाईन कार्यन्वित केली आहे. याद्वारे ज्येष्ठांना विविध प्रकारची मदत मिळत आहे. यासंदर्भात सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री रतन लाल कटारिया यांनी माहिती दिली आहे. ते म्हणाले की, एल्डरलाइन प्रकल्पांतर्गत प्रमुख राज्यांमध्ये सुरू केलेल्या कॉल सेंटरच्या (टोल फ्री क्रमांक – 14567) ला मोठे यश मिळत आहे. कोविड महामारीच्या काळात ही हेल्पलाइन विलक्षण कार्य करीत आहे.
उदा. कसगंज जिल्ह्यात, ७० वर्षांच्या उपाशी, निराधार, ज्येष्ठ महिलेला या हेल्पलाइनच्या माध्यमातून वृद्धाश्रम उपलब्ध करून देण्यात आले. `एल्डरलाइन`ने ७० वर्षांच्या माजी सैनिकाला मदत केली, जे आपल्या घरी पोहोचण्यासाठी गेल्या दीड महिन्यापासून चांदौसी बस स्थानकात अडकून राहिले होते. `एल्डरलाइन` हे हजारे ज्येष्ठ नागरिकांना सहाय्य करीत आहे, मंत्र्यांनी सांगितले. ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगजनांसाठी लसीकरणाची प्रक्रिया सोपी करण्यासाठी, सरकारने त्यांच्यासाठी `नियर होम` (घराजवळ) लसीकरण केंद्रे सुरू करण्याची परवानगी दिली आहे, असेही कटारिया यांनी सांगितले.