विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
कोरोना महामारीच्या तिसर्या लाटेची शक्यता आणि पर्यटनस्थळांवर होणारी बेजबाबदार गर्दी पाहून केंद्र सरकार कठोर झाले आहे. गर्दीच्या ठिकाणांवर अंकुश लावण्यासह कोरोना नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी जबाबदार अधिकार्यांविरोधात कारवाई करण्याच्या सूचना केंद्राने राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना केल्या आहेत. देशात कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण कमी होत नाहीये. देशात एका दिवसात ३८,७९२ नवे रुग्ण आढळले असून, ६२४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
बाजारांमध्ये होतेय गर्दी
सार्वजनिक ठिकाणांवर कोरोनाच्या नियमांचे पालन होत नसल्याचे केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांनी राज्ये आणि केंद्राशासित प्रदेशांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे. शारिरीक अंतर राखण्याच्या नियमांचे बाजारांमध्ये सर्रास उल्लंघन केले जात आहे. कोरोनाची दुसरी लाट अद्याप संपलेली नाही. कोणत्याही प्रकारचा बेजबाबदारपणा खपवून घेतला जाणार नाही. त्यामुळे लोकांना नियमांचे पालन करण्यास प्रवृत्त करावे.
विशेष सतर्कता बाळगावी
केंद्रीय गृहसचिव भल्ला म्हणाले, संसर्गाचा दर कमी होण्यासह सक्रिय रुग्णसंख्येत घट होत असल्याने विविध राज्यांमध्ये हळूहळू आर्थिक व्यवहार सुरू केले जात आहेत. व्यवहार सुरू करताना विशेष सतर्कता बाळगणे आवश्यक आहे. संसर्गाचा दर कमी होत असेल तर असे उपाय करावे जेणेकरून अचानक रुग्णसंख्येत वाढ होणार नाही. कोणत्याही ठिकाणी, संस्था, परिसर, बाजार अशा ठिकाणी कोरोना नियमांचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आल्यास तिथे पुन्हा कठोर निर्बंध लागू केले जाऊ शकतात. उल्लंघन करणार्यांविरोधात योग्य कायद्याखाली कठोर कारवाई केली जाणार आहे.
बेजबाबदारपणाचे परिणाम
पर्यटनस्थळांवर आणि बाजारांमध्ये बेजबाबदारपणे फिरणार्या लोकांमुळे आणि कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याचे परिणाम समोर येऊ लागले आहेत. अनेक राज्यात आर-फॅक्टर वाढू लागला आहे. एक व्यक्ती किती लोकांना बाधित करतो, याला आर-फॅक्टर असे म्हणतात. सध्या राष्ट्रीय स्तरावर आर-फॅक्टर एकापेक्षा कमी आहे. परंतु ईशान्येकडील राज्यासह अनेक राज्यात आर-फॅक्टर एकपेक्षा अधिक आहे. आर-फॅक्टर एकापेक्षा जास्त असणे म्हणजे संसर्गात वाढ होत आहे.
हॉटस्पॉटवर नजर ठेवा
पत्रात भल्ला सांगतात, दुकाने, मॉल, बाजार, साप्ताहिक बाजार, सार्वजनिक पार्क, जिम, बँक्वेट हॉल आणि कोरोनाचा प्रसार होऊ शकणार्या कोरोना हॉटस्पॉटवर नजर ठेवावी. अशा ठिकाणांवर कोरोनाचे नियम पाळले जात आहे किंवा नाही याबाबत सुनिश्चित करावे.
तपासणीचा वेग कायम ठेवावा
कोरोना संसर्गचे निदान करण्यासाठी तपासणीची गती कायम ठेवावी, यामध्ये शिथिलता ठेवू नये. बाधित लोकांची ओळख पटविल्यास कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यास मदत मिळेल, असे भल्ला म्हणाले. राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी पंचसूत्रीवर लक्ष केंद्रित करावे. टेस्ट-ट्रॅक-ट्रिट-लसीकरण आणि नियमांचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.