नवी दिल्ली – डिजिटलायझेशनबाबत आक्रमक असणार्या केंद्र सरकारने मोबाइल नेटवर्क आणि इंटरनेट सुविधेची गुणवत्ता आणखी उत्तम देण्यासाछी ६जी नेटवर्कच्या परीक्षणाची तयारी सुरू केली आहे. दूरसंचार विभागाने याची जबाबदारी सी-डॉट या सरकारी टेलिकॉम संशोधन कंपनीला दिली आहे. सी-डॉट कंपनीला ६जी नेटवर्कसंदर्भातील सर्व तांत्रिक शक्यतांवर विचार करण्यास सांगण्यात आले आहे.
सॅमसंग, एलजी आणि हुवावेसारख्या जगभरातील स्मार्टफोन निर्माता कंपन्यांनी यापूर्वीच ६जी तंत्रज्ञानावर काम सुरू केले आहे. एका वृत्तानुसार, ६जी तंत्रज्ञानात इंटरनेटचा वेग ५जी तंत्रज्ञानाच्या तुलनेत ५० पटीने असू शकतो. एका अंदाजानुसार, जगात ६जी तंत्रज्ञान २०२८-३० पर्यंत बाजारात येण्याची शक्यता आहे. भारतात सध्या ५ जी नेटवर्कवर परीक्षण सुरू असून, त्याचे अनावरण अद्याप बाकी आहे.
५जी नसताना ६जीचा अट्टहास का?
भारतात सध्या मोबाइल ४जी तंत्रज्ञानावर काम करतात. ५जीचे परीक्षण सुरू आहे. त्याचे अनावरण होण्यास काही वेळ लागू शकतो. तेव्हा ५जी तंत्रज्ञान आलेले नसताना ६जीचे परीक्षण सुरू करण्याचा अट्टहास का केला जात आहे, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. इतर देशांच्या कंपन्यांपेक्षा मागे राहू नये, तसेच या कामात उशीर होऊ नये यासाठी ६जीचे परीक्षण करण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे.