नवी दिल्ली – शेतीसह कृषी निगडीत व्यवसायांना चालना देण्यासाठी केंद्र सरकारने पीएम किसान पीएफओ योजनेची सुरुवात केली आहे. या योनेअंतर्गत सरकार शेतकर्यांना १५ लाख रुपयांची मदत करणार आहे. पीएफ किसान एफपीओ योजनेचा लाभ मिळण्यासाठी सरकारने अद्याप नोंदणी प्रक्रिया सुरू केलेली नाही. लवकरच यासंदर्भातील परिपत्रक काढले जाणार असून, त्यानंतर शेतकरी या योजेनेचा लाभ घेऊ शकणार आहेत. काय आहे ही योजना याबाबत जाणून घेऊयात.
मदत कशी
या योजनेअंतर्गत देशभरातील शेतकर्यांच्या गटाला किंवा संघटनेला सरकारकडून १५ लाखांची मदत केली जाणार आहे. शेतीविषयक व्यवसाय सुरू करण्याच्या दृष्टीने ११ शेतकर्यांना एकत्र येऊन गट किंवा संघटना बनवावी लागेल. कृषी संबंधित उपकरणे, खते, किटकनाशके, बियाणे आदी वस्तूंची खरेदी करण्यास मदत होणार आहे.
उद्दीष्ट
शेतकर्यांना प्रत्यक्ष लाभ मिळण्यासाठी सरकारडून विविध योजना आणल्या जात आहेत. त्यापैकी ही एक योजना आहे. त्यासाठी शेतकर्यांना कोणत्याही दलाल किंवा सावकाराकडे जाण्याची गरज भासणार नाही. या योजेनेअंतर्गत शेतकर्यांना तीन वर्षांत हफ्त्यांद्वारे पैसे दिले जातील. सरकारकडून २०२४ पर्यंत ६,८८५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
दुप्पट लाभ
पीएम किसान योजनेअंतर्गत मिळणारी रक्कम दुप्पट होण्याची शक्यता आहे. पीएम किसान सम्मान निधी योजनेमध्ये ३० सप्टेंबरपर्यंत नाव नोंदविण्याची संधी आहे. मुदतीच्या आत नोंदणी केल्यास लाभार्थ्यांना ४ हजार रुपयांचा लाभ मिळू शकतो. पात्र शेतकर्यांची नोंदणी झाल्यानंतर ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये दोन हजार रुपये मिळणार आहेत. त्यानंतर डिसेंबरमध्ये दोन हजार रुपयांचा आणखी एक हफ्ता जमा होणार आहे. पीएम किसान सम्मान निधी योजनेअंतर्गत सरकारने आतापर्यंत ९ हप्ते जमा केले आहेत. २०१८ पासून या योजनेची सुरुवात झाली होती. २०२२ पर्यंत शेतकर्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा हेतू या योजनेमागे आहे.