विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
कोरोना काळात परीक्षा घेण्याआधी सर्वांचे लसीकरण करणे गरजेचे आहे अशा सूचना राज्यांकडून मिळाल्यानंतर आता बारावीच्या परीक्षेआधी सर्व शिक्षकांचे लसीकरण करण्याची तयारी सुरू झाली आहे. राज्यांमध्ये विशेष शिबिरे घेऊन लसीकरण करण्यात येणार आहे. त्यापूर्वी लसींची उपलब्धता आणि शिक्षकांची संख्या मोजली जात आहे. लसीच्या उपलब्धतेनुसार १८ वर्षे आणि त्याहून अधिक वय असलेल्या विद्यार्थ्यांचे परीक्षेपूर्वी शिबिर लावून लसीकरण केले जाणार आहे.
उत्तर प्रदेशात ग्रामपंचायत निवडणुकीदरम्यान ड्यूटीवर असताना काही शिक्षकांचा मृत्यू झाला होता. त्यावरून वाद निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर शिक्षकांवरून आता कोणताही धोका पत्करायला केंद्र सरकार तयार नाही. त्यामुळे सर्व शिक्षकांचे शभर टक्के लसीकरण करण्याच्या योजनेवर सरकार काम करत आहे.
१८ वर्षांवरील सर्वांचे लसीकरण करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. हीच गोष्ट पुढे करून कोणत्याही परीक्षा घेण्यापूर्वी १८ वर्षांवरील विद्यार्थ्यांच्या लसीकरणाला प्राधान्य देण्याची मागणी राज्यांनी केंद्राकडे केली होती. सीबीएसईसह स्पर्धा परीक्षा घेणार्या संस्थांना याबाबत योजना तयार करण्याचा सल्ला देण्यात आला. परीक्षांदरम्यान विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी कठोर नियम बनविले जात आहेत. त्यामध्ये प्रत्येक शाळांमध्ये विलगीकरण केंद्र आणि प्राथमिक उपचाराच्या सुविधा देण्याचा समावेश आहे.