नवी दिल्ली – शालेय विद्यार्थ्यांमध्ये नावीन्यतेचे बीज सुरुवातीपासूनच रोवले जावे यासाठी शिक्षण मंत्रालयाने केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई), अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (एआयसीटीई) आणि आदिवासी विकास मंत्रालय यांनी मिळून एक मोठी योजना तयार केली आहे. याअंतर्गत शाळांमध्ये आता नावीन्यतेसंदर्भात अॅम्बेसेडर नियुक्त केले जाणार आहेत. विद्यार्थ्यांमध्ये नावीन्यपूर्ण कल्पनाशक्ती निर्माण करण्याचे प्रयत्न करण्यासह त्यांच्या कल्पनांना बळ देण्याचे कामही अॅम्बेसेडर करणार आहेत. सध्या शाळेतील शिक्षकच हे काम करणार आहेत. त्यासाठी लवकरच शिक्षकांना एक विशेष प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
नावीन्यतेला प्राधान्य
राष्ट्रीय शिक्षण धोरण लागू केल्यानंतर केंद्र सरकारकडून संशोधन आणि नावीन्यपूर्ण गोष्टींना प्रोत्साहन देण्यात येत आहे. त्यामुळेच शिक्षण मंत्रालयाने उचललेल्या या पावलाला महत्त्व प्राप्त झाले आहे. शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी यासंदर्भातील योजनेला हिरवा कंदील दाखविला आहे. त्याअंतर्गत देशभरात जवळपास ५० हजार शिक्षकांना इनोव्हेशन अॅम्बेसेडरशी संबंधित प्रशिक्षण दिले जाणार आहे. एकट्या उत्तर प्रदेशातून साडेसहा हजार शिक्षक सहभागी होणार आहेत.
हे शिक्षक होणार सहभागी
विशेष म्हणजे, यामध्ये सीबीएसई, आदिवासी बांधवांच्या मुलांसाठीचे एकलव्य शाळा आणि सरकारी शाळांमध्ये शिकविणारे शिक्षक सहभागी होणार आहेत. नावीन्यपूर्ण गोष्टींमध्ये रूची ठेवणार्या शिक्षकांना प्रशिक्षणासाठी नोंदणी करावी लागणार आहे. हे संपूर्ण प्रशिक्षण ऑनलाइन असणार आहे.
दोन महिन्यांच्या आत प्रशिक्षण
दोन महिन्यांच्या आता शिक्षकांना प्रशिक्षण देण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. इनोव्हेशन अॅम्बेसेडरशी संबंधित या प्रशिक्षणात दिल्लीतील जवळपास तीन हजार शिक्षक सहभागी होणार आहेत. मध्ये प्रदेशातून २६००, बिहारमधून पंधराशे शिक्षकांना प्रशिक्षित केले जाणार आहे.
७२ तासांचे प्रशिक्षण
शिक्षकांना इनोव्हेशन अॅम्बेसेडरच्या रूपात तयार करण्यासाठी प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्याअंतर्गत त्यांना ७२ तासांचे ऑनलाइन प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यामध्ये नावीन्यता, योजनेचा आराखडा, उत्पादनांचा विकास, सृजनशीलता, उद्योजकता आदी विषयांचा समावेश असेल. या प्रशिक्षणाचा मॉडेल एआयइसीईने तयार केला आहे. शिक्षकांना या प्रकारे देण्यात येणारे हे पहिलेच प्रशिक्षण असेल.