नाशिक – कांद्याच्या उत्पादनासह इतर शेतीमालाच्या उद्योगांना चालना मिळावी यासाठी केंद्र सरकारने पंतप्रधान सुक्ष्म अन्न उद्योग प्रक्रिया योजना कार्यान्वित केली आहे. या योजनेंतर्गत कांदा उत्पादक शेतकऱ्यांना शासनाकडून मोठ्याप्रमाणावर कर्ज उपलब्ध होणार असून भरघोस अनुदान देखील मिळणार आहे. सदर योजनेचा लाभ वैयक्तिक शेतकऱ्यांसह शेतकरी उत्पादक कंपनी तसेच शेतकरी गटांना होणार आहे. या योजनेतील त्रुटी कमी करण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न करणार असल्याचे स्पष्ट करीत शासन, प्रशासन आणि शेतकरी यांनी एकत्रित काम करुन शेतकऱ्यांच्या आर्थिक भरभराटीसाठी असलेली पंतप्रधान सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (पी.एम.एफ.एम.ई.) गावपातळीवरील शेवटच्या लाभार्थ्यांपर्यन्त पोहचवावी, असे आवाहन खासदार हेमंत गोडसे यांनी केले आहे.
गेल्या काही महिन्यांपासून केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी पंतप्रधान सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग, योजना देशपातळीवर सुरु केली आहे. परंतु सदर योजनेची फारसी माहिती गावपातळीवरील शेतकऱ्यांपर्यन्त पोहचलेली नाही. याची दखल घेवून खा. गोडसे यांनी कृषि विभागाच्या प्रशासनाला आदेशित करुन शहरातील उंटवाडी परिसरातील संभाजी चौक येथील ‘आत्मा’ या प्रशिक्षण केंद्राच्या कार्यालयात आज एक विशेष बैठक घेतली. यावेळी प्रकल्प संचालक राजेंद्र निकम यांनी योजनेचे सादरीकरण केले. याप्रसंगी बोलतांना खा. गोडसे यांनी वरील आवाहन केले. यावेळी कृषि विभागाचे जिल्हा अधीक्षक विवेक सोनवणे, प्रकल्प उपसंचालक हेमंत काळे, नाबार्डचे अमोल लोहकरे, बाळासाहेब वाघ, अनिल ढिकले, तानाजी गायकर आदी मान्यवरांसह योजनेच्या संबंधित रिर्सोस पर्सन, जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमधील तालुका कृषि अधिकारी यांच्यासह कांदा उत्पादक शेतकरी मोठ्यासंख्येने उपस्थित होते.









