विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
कोरोना विषाणूचा सर्व लोकांना समान धोका आहे. कोणालाही विषाणूची बाधा होऊ शकते. त्यामुळे सर्वांनी लस घेणे गरजेचे आहे, असे सरकारकडून सांगण्यात आले आहे. कोरोनावर मात करण्यासाठी सध्या तरी लसीकरण हाच एकमेव उपाय आहे. मात्र गर्भवतींच्या मनात लसीकरणाबाबत अनेक शंका-कुशंका आहेत. गर्भवतींनी लस घ्यावी, असे केंद्र सरकार आणि आयसीएमआरकडून आधीच स्पष्ट करण्यात आले आहे. लोकांच्या मनातील शंका दूर करण्यासाठी केंद्राकडून आता याबाबत मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. गर्भवतींसाठी कोरोना प्रतिबंधित लस पूर्णपणे सुरक्षित असून, संसर्गाचा धोका वाढत नाही, असे केंद्राकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
गर्भवतींनी लस का घ्यावी
गर्भवतींना संसर्ग झाल्यास सुरुवातीला कोरोनाचे लक्षण खूपच सौम्य असतात. परंतु त्यांची प्रकृती खालावू शकते, असे अनेक प्रकरणात दिसून आले आहे. त्याचा परिणाम भ्रूणावरही होऊ शकतो. त्यासाठी गर्भवतींनी आपली सुरक्षा सुनिश्चित करावी.
कोरोना लसीने संरक्षण शक्य
केंद्रीय आरोग्य मंत्रालयानुसार, देशात उपलब्ध कोविड लशी सुरक्षित आहेत. लसीकरणाने गर्भवतींचे संरक्षण शक्य आहे. कोणत्याही औषधांप्रमाणे याही लशीचे थोडे दुष्परिणाम जाणवतील. पण ते खूपच सौम्य असतील. लस घेतल्यानंतर ताप, इंजेक्शन घेतलेल्या जागेवर दुखणे असे परिणाम दोन तीन दिवस दिसतील. लस घेणार्या गर्भवतींना २० दिवसांनंतरही काही लक्षणे दिसू शकतात. त्यावर त्वरित लक्ष देण्याची गरज आहे.
नवजात बालकांचे आरोग्य
कोरोनाबाधित मातांचे ९५ टक्क्यांहून अधिक बालकांचा जन्म चांगल्या स्थितीत झाला आहे. कोरोनाची बाधा झाल्यानंतर काही प्रकरणात वेळेच्या आता प्रसूती झाल्याचे दिसून आले आहे. अशा मुलांचे वजन २.५ किलोहून कमी असू शकते. दुर्मिळ परिस्थितीत तसेच जन्मापूर्वी बाळाचा मृत्यू होऊ शकतो.
बाधित मातांचा बरे होण्याचा दर
गर्भवतींना कोरोनाचा संसर्ग झाल्यास त्यांच्यापैकी ९० टक्के महिलांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज पडत नाही. त्या घरीच उपाचाराने बर्या होऊ शकतात. तर काहींची प्रकृती ढासळूही शकते. लक्षणे असलेल्या गर्भवतींना गंभीर आजार आणि मृत्यूचा धोकाही उद्भवून शकतो. गंभीर संसर्ग झालेल्या गर्भवतींना इतर लोकांप्रमाणे रुग्णालयात दाखल होण्याची गरज आहे. उच्च रक्तदाब, स्थूलता, ३५ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या गर्भवतींना गंभीर संसर्गाचा धोका असतो.
कोविडनंतर कोणत्या समस्या
ज्या महिला ३५ वर्षांहून अधिक वयाच्या आहेत, ज्यांना मधुमेह, उच्च रक्तदाब आहे, ज्यांच्या शरीरात रक्ताच्या गाठी होत होत्या, अशा महिलांना अधिक धोका असतो. गर्भावस्थेत कोविड झाल्यास प्रसूतीनंतर त्यांनी कोविडची लस घेणे गरजेचे आहे. कोणत्याही लसीकरण केंद्रावर जाऊन गर्भवतींना लस घेता येऊ शकते. किंवा कोविन अॅपवर नोंदणी करूनही लस घेता येऊ शकते.