विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
देशातील कोरोना संसर्गाच्या दुसर्या लाटेच्या कहरानंतर आता कोरोनाची तिसरी लाट देखील देशात प्रवेश करण्याची शक्यता आहे. मात्र ती लाट केव्हा येईल हे अद्याप निश्चित माहित नाही. परंतु तिसऱ्या लाटेपासून जनतेच्या संरक्षणासाठी आपण तयार असले पाहिजे, अन्यथा कठीण परिस्थिती निर्माण होऊ शकते, असा इशारा केंद्र सरकारचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार के. विजय राघवन यांनी दिला आहे.
राघवन म्हणाले की, कोरोनाची दुसरी लाट इतकी तीव्र आणि दिर्घकाळ असेल, याचा अंदाजही नव्हता. या विषाणूचे अत्यधिक रूग्ण वाढत होत असून तिसरा टप्पा अजून येणे बाकी आहे, परंतु तो कधी येईल हे स्पष्ट झाले नाही. मात्र आपण नवीन लाटांच्या विरोधात तयारी केली पाहिजे. या विषाणूचे प्रादुर्भाव पहिल्या सारखाच पसरत आहे. नवीन प्रकारच्या संक्रमणाचे गुणधर्म नसून विद्यमान विषाणूच्या प्रकाराविरूद्ध लस प्रभावी असल्याचेही ते म्हणाले.
त्याचप्रमाणे देशात आणि जगात विषाणूची नवीन रूपे येतील. लाट संपल्यानंतर सावधगिरी कमी केल्याने विषाणूचा पुन्हा प्रसार होण्याची संधी मिळते. काही राज्यांमध्ये कोरोना प्रकरणात घट होण्याची चिन्हे आहेत, परंतु १२ राज्यात अजूनही १ लाखाहून अधिक सक्रिय प्रकरणे आहेत. देशातील १० राज्यात पॉझेटिव्ह दर २५ टक्क्यांपेक्षा जास्त आहे आणि त्यामध्ये अधिक काम करण्याची गरज आहे.
दरम्यान, आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल म्हणाले की, एक दिवस पूर्वीच्या तुलनेत तब्बल २.४ टक्के रुग्णांची संख्या वाढली आहे, तर काही राज्यात अधिक रुग्णांचा मृत्यूही झाला आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, दिल्ली, हरियाणा येथे जास्त मृत्यू झाले आहेत. कर्नाटक, केरळ, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, राजस्थान आणि बिहारसारख्या राज्यांमध्ये कोरोना दररोजच्या घटनांमध्ये वेगाने वाढ होत अग्रवाल यांनी सांगितले.