विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
देशातील कोरोना रूग्णांच्या संख्येत होणारी प्रचंड वाढ पाहता मे महिन्यातील नियोजित केलेल्या सर्व ऑफलाइन परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात, अशी सूचना करीत केंद्र सरकारच्या मानव संसाधन विभागातील उच्च शिक्षण सचिव अमित खरे यांनी सर्व केंद्रीय संस्थांना पत्र लिहिले आहे.
केंद्र सरकारकडून निधी मिळविणार्या शिक्षण संस्थांचे कुलगुरू व संचालकांना लिहिलेल्या पत्रात अमित खरे यांनी म्हटले आहे की, सध्याच्या परिस्थितीत तुमच्या संस्थेत विद्यार्थ्यांसह कोणालाही मदतीची गरज असेल तर त्यांना सर्वतोपरी मदत केली पाहिजे. त्यांना शक्य तितक्या लवकर तणावातून मुक्त होण्यासाठी सक्षम करावे. तसेच लसीसाठी पात्र असलेल्यांना लसी देण्यास प्रोत्साहित करणे देखील आवश्यक आहे आणि कोविड -१९ च्या नियमांचे पालन करून प्रत्येकजण सुरक्षित रहायला पाहिजे.
१ मे पासून १८ वर्षांवरील नागरिकांसाठी लसीकरण मोहीम सुरू झाल्यामुळे खरे यांनी विद्यार्थ्यांना लसीकरण मोहिमेत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करण्याचे आवाहन संस्थेच्या प्रमुखांनी केले. सद्यस्थिती लक्षात घेता संस्थांना ऑनलाईन वर्ग सुरू ठेवण्यास सांगितले आहे. तसेच जून २०२१ मधील परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतरच पुढील निर्णय घेतला जाईल. विशेष म्हणजे जेईई, एनईईटी आणि आयसीएआय आणि एसएससी, यूपीएससी स्पर्धा परीक्षांसारख्या अनेक परीक्षा भारतातील वाढत्या कोरोना रूग्णांमुळे पुढे ढकलण्यात आल्या आहेत.