विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
कोरोनाची बाधा झाल्यानंतर लस घ्यावी का, घेतल्यास कोरोनातून बरे झाल्यानंतर किती दिवसांनी घ्यावी, असे अनेक प्रश्न सामान्य लोकांच्या मनात आहेत. सरकारकडूनही वेगवेगळ्या पातळीवर आढावा घेऊन माहिती दिली जात आहे. परंतु तज्ज्ञांच्या गटाने मोदी सरकारला एक वेगळाच सल्ला दिला आहे.
कोरोनाचा संसर्ग होऊन गेलेल्या लोकांना लसीकरणाची गरज नाही, असे सार्वजनिक आरोग्य तज्ज्ञांच्या एका गटाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सादर केलेल्या अहवालात म्हटले आहे. तसेच अंधाधुंद आणि अपूर्ण लसीकणामुळे कोरोना विषाणूच्या विविध अवतारांचा प्रादुर्भाव होऊ शकतो, असा इशाराही तज्ज्ञांनी दिला आहे. ज्यांना कोरोनाची बाधा झालेली आहे, त्यांच्या लसीकरणाची आवश्यकता नाही, असे त्यांनी सांगितले.
तज्ज्ञांच्या या गटात अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचे (एम्स) डॉक्टर, कोविडसंदर्भातील राष्ट्रीय कार्यदलातील सदस्यांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच भारतीय सार्वजनिक आरोग्य संघटना, इंडियन असोसिएशन ऑफ एपिडमोलॉजिस्ट आणि इंडियन असोसिएशन ऑफ प्रिव्हेंटेड अँड सोशल मेडिसिनच्या तज्ज्ञांनी हा अहवाल तयार केला आहे.
तज्ज्ञांच्या अहवालानुसार, मोठ्या प्रमाणात लसीकरण करून घेण्याऐवजी जे लोक संवेदनशील आणि जोखमेच्या श्रेणीत येतात अशाच लोकांचे लसीकरण केले जावे. देशात महामारीची सद्दपरिस्थितीच्या मागणीनुसार, या टप्प्यात सर्व वयोगटातील लोकांचे लसीकरण करण्याऐवजी महामारीसंदर्भातील आकड्यांवरून स्वतःला निर्देशित केले पाहिजे. कमी वयाच्या मुलांचे लसीकरण पुराव्यांवर आधारित नसून, ते परवडणारेसुद्धा नाही. अनियोजित लसीकरणामुळे विषाणूंच्या विविध अवतारांच्या प्रादुर्भावाचा धोका संभावतो.