विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
केंद्र सरकारच्या आदेशानुसार केंद्रीय कर्मचार्यांच्या महागाई भत्ता (डीए) वाढवल्यानंतर सरकारने घरभाडे भत्ता (एचआरए) मध्येही बदल केला आहे. यासह ऑगस्टच्या पगारामध्ये एचआरएचीही वाढ होणार आहे. कारण डीएने 25 टक्केचा टप्पा ओलांडला आहे.
अर्थ मंत्रालयाच्या आदेशानुसार आता केंद्रीय कर्मचार्यांना त्यांच्या शहरानुसार 27 टक्के, 18 टक्के आणि 9 टक्के घरभाडे भत्ता मिळेल. हे वर्गीकरण एक्स, वाय आणि झेड वर्गातील शहरांनुसार आहे. म्हणजेच एक्स क्लास सिटीमध्ये राहणाऱ्या केंद्रीय कर्मचाऱ्याला आता अधिक एचआरए मिळणार आहे. यानंतर वाय वर्ग आणि त्यानंतर झेड वर्गात वाढ केली आहे.
अलाहाबाद एजी ऑफिस ब्रदरहुडचे माजी अध्यक्ष आणि अखिल भारतीय ऑडिट अँड अकाउंट्स असोसिएशनचे सहायक सरचिटणीस हरीशंकर तिवारी यांच्या मते, 7 व्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीनंतर केंद्र सरकारने एचआरएची पद्धत बदलली होती. यात एक्स, वाय व झेडच्या 3 श्रेणी बनविल्या गेल्या. त्यानुसार 27 टक्के, 18 टक्के आणि 9 टक्के एचआरए घेण्याचा निर्णय घेण्यात आला.
हरिशंकर तिवारी यांच्या म्हणण्यानुसार एक्स श्रेणी अव्वल आहे. शहराचे अपग्रेडेशनही एचआरए अंतर्गत केले जाते. सुमारे 50 लाख किंवा त्याहून अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये काम करणार्या कर्मचार्यासाठी किमान 5400 रुपयांचा एचआरए निश्चित केलेला आहे. तर दुसर्या प्रकारात हे दरमहा किमान 3600 रुपये आणि 1800 रुपये आहे. आता नव्या दराच्या आधारे एचआरएची गणना केली जाईल.