नवी दिल्ली – दिवाळीचा सण आला की प्रत्येक जण एका गोष्टीची आतुरतेने वाट पाहत असतो, ती गोष्ट म्हणजे बोनस होय. मग शासकीय कर्मचारी असो की खासगी कंपनीत काम करणारे कामगार असो. सर्वांनाच बोनस मिळण्याची अपेक्षा असते. विशेषतः सरकारी कर्मचाऱ्यांना चांगला बोनस मिळतो, त्यातही केंद्र सरकारचे कर्मचारी असल्यास त्यांची तर चांदीच होती असेही म्हटले जाते. कोरोनाच्या कालावधीनंतर आता केंद्र सरकारने यंदा बोनस जाहीर करणार केला आहे.
यंदा कोणाला किती आणि कसा बोनस मिळणार आणि कुणाला मिळणारच नाही! याची प्रत्येकालाच उत्सुकता आहे. केंद्र सरकारने 2020-21 या आर्थिक वर्षासाठी केंद्रीय कर्मचाऱ्यांना नॉन प्रॉडक्टिव्हिटी लिंक्ड फंड म्हणजेच बोनस जाहीर केला आहे. तथापि, यात काही अटी देखील आहेत. या अटींबद्दल जाणून घेऊ या…
यांना मिळणार
यंदा नॉन-प्रॉडक्टिव्हिटी लिंक्ड फंड तथा बोनस ग्रुप-सी मधील केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना आणि ग्रुप-बी मधील सर्व नॉन-राजपत्रित कर्मचाऱ्यांना दिले जाईल. त्यात असे कर्मचारी सहभागी आहेत, ज्यांना कोणत्याही उत्पादकता जोडलेल्या बोनस योजनेअंतर्गत संरक्षण मिळत नाही. उदा. केंद्रीय निमलष्करी दल आणि सशस्त्र दलाचे कर्मचारीही बोनससाठी पात्र असतील.
यांना मिळणार नाही
31 मार्च 2021 पूर्वी राजीनामा, सेवानिवृत्त किंवा सेवा संपलेल्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत बोनस देण्याच्या काही अटी आहेत. उदाहरणार्थ, यापैकी, केवळ वैद्यकीय आधारावर सेवानिवृत्त झालेल्या किंवा 31 मार्च 2021 पूर्वी मरण पावलेल्यांनाच बोनस दिला जाईल. परंतु या प्रकरणांमध्येही, वर्षभरात किमान सहा महिने नियमित सेवा असणे आवश्यक आहे.
कसे मिळणार
या बोनसच्या देयकाची गणना मर्यादा 7,000 रुपये मासिक इतकी असेल. म्हणजे तात्पुरत्या बोनसची रक्कमही सरासरी पगार तथा वेतन यात जे कमी असेल त्या आधारावर मोजली जाईल, असे शासकीय वित्त विभागाने सांगितले आहे.
या कर्मचाऱ्यांना 18 हजार
केंद्र सरकारने रेल्वेच्या नॉन-राजपत्रित कर्मचाऱ्यांना उत्पादकता आधारित बोनस (PLB) देण्याची घोषणा केली आहे. कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात येणाऱ्या बोनसची रक्कम किती असेल? किती रक्कम प्राप्त होईल ? तर सरकारने जारी केलेल्या प्रसिद्धीनुसार, रेल्वेच्या नॉन-राजपत्रित कर्मचाऱ्यांना या आर्थिक वर्षासाठी 78 दिवसांच्या पगाराइतके बोनस मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे पात्र रेल्वे कर्मचाऱ्यांना बोनस जास्तीत जास्त देय रक्कम 17,951 रुपये इतकी मिळणार आहे.