नवी दिल्ली – केंद्रातील मोदी सरकारने दिवाळीच्या तोंडावर देशभरातील केंद्रीय कर्मचाऱ्यांना गोड भेट दिली आहे. विशेष म्हणजे, केंद्र सरकारने ३ महिन्याच्या आत केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात दोनदा वाढ करण्यात आली आहे. याचा अर्थ एकाच वर्षात तब्बल १४ टक्के वाढ करण्यात आली आहे. जुलै महिन्यात केंद्र सरकारने महागाई भत्त्यात ११ टक्के वाढ केली होती. त्यानंतर आता पुन्हा ३ टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. परिणामी, केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता आता ३१ टक्क्यांपर्यंत पोहचला आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळाने महागाई भत्त्याबाबत आज निर्णय घेतला आहे. त्यामुळे केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना मोठी भेट मिळाली आहे. देशभरातील तब्बल ४७ लाख केंद्रीय कर्मचारी आणि ६८ लाख पेन्शनधारकांना याचा थेट फायदा होणार आहे. हा वाढीव महागाई भत्ता गेल्या १ जुलैपासून लागू होणार आहे. म्हणजेच, जुलै ते सप्टेंबर या तीन महिन्यांचा एकत्रित भत्ता मिळणार आहे. कोरोनाच्या संकटामुळे केंद्र सरकारने मे २०२० ते ३० जून २०२१ या काळात महागाई भत्त्यात कुठलीही वाढ न करण्याचे जाहीर केले होते. त्यानंतर १ जुलैपासून आता त्यात वाढ केली जात आहे.
https://twitter.com/ANI/status/1451123099420688390