विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
कोरोना महामारीची दुसरी लाट ओसरत असताना सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी अधिक सतर्कता बाळगण्याच्या सूचना केंद्र सरकारने केल्या आहेत. केंद्राने राजस्थान, त्रिपुरा, आसाम, केरळ, बंगालसह १४ राज्यांना पत्र लिहून २१ ते २७ जूनदरम्यान कोरोना संसर्गाचा दर १० टक्क्यांहून अधिक असलेल्या राज्यांनी संसर्ग रोखण्याच्या उपायांची कठोर अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत.
देखरेख ठेवून उपाययोजना
केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना लिहिलेल्या पत्रात विविध सूचना केल्या आहेत. रुग्णसंख्या कमी झाली असली तरी जिल्हा आणि तालुकास्तरावर देखरेख ठेवण्यावर भर देण्यात आला आहे. नव्या रुग्ण क्षेत्रांची ओळख पटविण्यासाठी जिल्हा नोडल अधिकारी जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्तांसोबत काम करावे. तसेच गरजेनुसार आवश्यक उपाययोजना लागू करणे सुनिश्चित करावे.
विचार करून निर्बंध शिथिल करावे
परिस्थिती सामान्य होत असताना निर्बंध शिथिल केले जात आहेत. परंतु परिस्थितीचा अभ्यास करून, सतर्कता बाळगून आणि विचार करूनच निर्बंध शिथिल केले जावे. वरील राज्यांव्यतिरिक्त मणिपूर, सिक्किम, पद्दुचेरी, ओडिशा, मेघालय, नागालँड, मिझोरम, अरुणाचल प्रदेश आणि हिमाचल प्रदेश या राज्यांनाही पत्र लिहिले आहे.
कठोर उपाययोजना करण्याचे निर्देश
भूषण यांनी आपल्या पत्रात गृहमंत्रालयाच्या २९ एप्रिलला दिलेल्या आदेशाचाही उल्लेख केला आहे. त्यामध्ये कोरोना प्रसार रोखण्यासाठी सर्व राज्यांनी कठोर उपाययोजना करण्याचे आदेश दिले होते. जास्त संसर्गाचा दर असलेल्या जिल्ह्यात परिस्थिती सुधारण्यासाठी कठोर उपाय योजने आवश्यक आहे, असे ते म्हणाले. संबंधित १० टक्क्यांहून अधिक संसर्गाचा दर असलेल्या जिल्ह्यांचाही त्यांनी उल्लखे केला आहे.
१४ दिवस निर्बंध लागू करावे
जिल्हा प्रशासनाने संसर्गाचा दर पाहून निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेतल्यास तर १४ दिवसांपर्यंत कठोर लागून करावे. जिल्ह्यातील ते भाग प्रतिबंधित क्षेत्रात येत नाहीत, तिथे निर्बंध शिथिल केले जाऊ शकतात, असे भूषण यांनी सांगितले.
सक्रिय रुग्णसंख्येत घट
कोरोना महामारीविरोधात लढा देताना भारतातील परिस्थितीत सुधारणा होत आहे. रुग्णसंख्या कमी होऊ लागली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढले आहे. परिणामी सक्रिय रुग्णांमध्ये घट झाली आहे. देशात सक्रिय रुग्णसंख्या साडेपाच लाखांहून कमी झाली आहे.
एका दिवसात ८१७ लोकांचा मृत्यू
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने बुधवारी (३० जून) सकाळी आठ वाजेपर्यंत अपडेट केलेल्या आकडेवारीनुसार, सक्रिय रुग्ण बाधित झालेल्या लोकांच्या १.७७ टक्के राहिले आहेत. सलग तिसर्या दिवशी मृतांचा आकडा एक हजारच्या खाली होता. वास्तविक ८१ दिवसांनंतर सर्वात कमी ८१७ लोकांचा मृत्यू झाला आहे. गेल्या २४ तासात ५० हजारांहून कमी रुग्ण आढळले आहेत. परंतु एका दिवसापूर्वीच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत रुग्णसंख्या वाढली आहे. पण रुग्णांचा बरे होण्याचा दर वाढून ९६.९२ टक्के झाला आहे. मृत्यूदर १.३१ टक्क्यांवर कायम आहे.