पुणे – केंद्र सरकारने नवे सहकार मंत्रालय तयार केल्याने त्याचा मोठा परिणाम महाराष्ट्रावर होणार असल्याची जोरदार चर्चा सध्या आहे. कारण, देशातील सहकार चळवळ आणि क्षेत्राचे मुख्य केंद्रबिंदू हे महाराष्ट्रच आहे. केंद्रात नवे मंत्रालय आल्याने त्याचा नक्की काय परिणाम महाराष्ट्रावर होईल यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी भाष्य केले आहे. बारामती येथे एका कार्यक्रमादरम्यान त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. पवार म्हणाले की, केंद्रातील नव्या सहकार खात्याला घाबरुन जाण्याचे कारण नाही. राज्य सरकार राज्यात समर्थ आहे. राज्याच्या सहकार क्षेत्रासाठी विधानसभेने कायदे केले आहेत, त्याची अंमलबजावणीही केली जात आहे. या कायद्यांमध्ये हस्तक्षेप करण्याचा अधिकार केंद्र सरकारला किंवा नव्या सहकार मंत्रालयाला नाही. त्यामुळे महाराष्ट्रावर गंडांतर येईल ही चर्चा निष्फळ आहे. मल्टीस्टेट बँकांबाबत केंद्रीय सहकार खाते काम बघेल. हे खातेही अचानक सुरू झालेले नाही. गेल्या १०-१५ वर्षांपासून त्यावर विचार सुरू होता, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे