नवी दिल्ली – देशात शेतकरी आंदोलनाचा भडका उडाल्यानंतर केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेतला आहे. पंजाबमधील शेतकऱ्यांना आता त्यांच्या उत्पादनाचा दर थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. ही व्यवस्था संपूर्ण देशात लागू होणार आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी ट्विट करून दिली आहे.
आपला शेतीमाल किमान हमीभावाने (एमएसपी) विकल्यानंतर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा होणार आहेत. देशाच्या स्वातंत्र्यानंतर शेतकर्यांच्या हितासाठी हा सर्वात मोठा बदल झाल्याचा दावा त्यांनी केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या या निर्णयाचा अल्पभूधारक शेतकऱ्यांना सुद्धा लाभ होणार आहे.
पीयूष गोयल म्हणाले, पंजाबमधील शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाचा हमीभाव मिळाल्यानंतर ती रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होणार असून भाड्याच्या जमिनीवर शेती करणार्या शेतकर्यांनाही याचा लाभ होणार आहे. व्यवस्थेमध्ये पारदर्शकता आल्यानंतर शेतकर्यांची कोणीही दिशाभूल करू शकणार नाही. तसेच त्यांना उत्पादनाचा योग्य भाव मिळेल असा विश्वास गोयल यांनी व्यक्त केला.
सरकारकडून केल्या जाणाऱ्या शेतमालाच्या खरेदीमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी थेट बँकेच्या खात्यात रक्कम जमा (डीबीटी) करण्याचा नियम केंद्रीय अर्थ मंत्रालयाने बनविला आहे. पंजाब वगळता सर्व राज्यांमध्ये हा नियम लागू केला आहे.
२०१८ आणि २०१९ दरम्यान केंद्राकडून पंजाबला बारा वेळा पत्र पाठविण्यात आले आहे. परंतु पंजाबने या नियमाला लागू करण्यास असमर्थता व्यक्त केली आहे. बाजार समित्यांमध्ये आडत्यांच्या दबावामुळे आणि बाजार समितीच्या नियमांमुळे हा निर्णय लागू करणे शक्य नसल्याचे सांगण्यात आले आहे. नागरी अन्न पुरवठा मंत्रालय, भारतीय खाद्य मंडळाच्या वरिष्ठ अधिकार्यांनी पंजाब सरकारच्या संपर्कात राहून हा तिढा सोडवण्याचा प्रयत्न केला. परंतु अद्याप तो सुटलेला नाही.
https://twitter.com/PiyushGoyal/status/1381651636808937475
https://twitter.com/PiyushGoyal/status/1381596490884280320