नवी दिल्ली – महाराष्ट्रातील अतिवृष्टग्रस्त शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने मोठी घोषणा केली आहे. यासंदर्भात लोकसभेत आज खासदारांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्यास केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी उत्तर दिले. तोमर म्हणाले की, अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रातील शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. त्याची दखल घेण्यात आली आहे. सरकार शेतकऱ्यांसोबत आहे. त्यासाठीच ७०१ कोटी रुपयांची मदत जाहिर करण्यात येत असल्याचे त्यांनी सभागृहाला सांगितले. महाराष्ट्र सरकारने जो अहवाल पाठविला आहे. त्याच्या आधारावर ही मदत जाहिर करण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शेतकऱ्यांना पीक विमा योजनेअंतर्गत ही मदत मिळणार आहे. या घोषणेमुळे शेतकऱ्यांना मोठा दुलासा मिळणार आहे.
दादा भुसे यांनी मानले आभार
राज्यात गेल्या वर्षी म्हणजे जून ते ऑक्टोबर २०२० दरम्यान झालेल्या मुसळधार पावसामुळे झालेल्या नुकसानीसंदर्भात एनडीआरएफमधून अर्थसहाय्य करण्याची विनंती राज्य सरकारने केंद्राकडे एका निवेदनाद्वारे केली होती. आज लोकसभेमध्ये केंद्रीय कृषिमंत्र्यांनी या अनुषंगाने पिकांच्या नुकसानीसाठी ७०१ कोटी रुपयांची मदत जाहीर केली, त्याबद्दल राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी धन्यवाद दिले आहेत.
गेल्या वर्षीच्या अतिवृष्टीनंतर नुकसान भरपाईपोटी ३७२१ कोटींची मागणी राज्य सरकारने केंद्राकडे केली होती. दरम्यानच्या काळात राज्य सरकारने निर्णय घेऊन ४३७५ कोटी शेतकऱ्यांना पिकांच्या नुकसानीपोटी वाटप केले. राज्याने केलेल्या ३७२१ कोटी रुपयांच्या मागणीपैकी ७०१ कोटी रुपये मदत देण्याचे आज केंद्र शासनाने घोषित केले आहे, अशी माहिती कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी दिली.
सध्याच्या नुकसानीसाठी देखील तातडीने मदतीची विनंती
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कोकणात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. यासंदर्भात राज्य सरकारतर्फे केंद्राला आर्थिक मदतीची विनंती करणार असून केंद्र सरकार याची योग्य ती दखल घेऊन तातडीने मदत करेल अशी अपेक्षा कृषिमंत्री श्री. भुसे यांनी व्यक्त केली आहे.