विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
भारतात १८ वर्षांवरील सर्वांना कोरोना प्रतिबंधक लसींचे दोन्ही डोस या वर्षी अखेरपर्यंत देण्याची घोषणा केंद्र सरकारकडून करण्यात आली आहे. डिसेंबरपर्यंत डोसच्या उपलब्धतेबाबत केंद्राकडून एक आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यानुसार जुलैपर्यंत देशात एकूण ५१.६ कोटी डोस उपलब्ध करण्यात येणार आहेत. यातील १७ कोटी डोस यापूर्वीच देण्यात आलेले आहेत. ऑगस्ट ते डिसेंबरपर्यंत २१६ कोटी डोसचे उत्पादन करण्यात येणार आहे. देशातील १८ वर्षांवरील वयाच्या जवळपास ९५ कोटी लोकांच्या दोन्ही डोस अधिक हे उत्पादन असेल.
विशेष म्हणजे यामध्ये आयात केलेल्या डोसचा समावेश नसेल. सर्व डोसचे उत्पादन भारतातच करण्यात येणार आहे. देशात लसींच्या तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांकडून टीका केली जात असताना नीती आयोगाचे सदस्य आणि लशींबाबत गठित कृती दलाचे प्रमुख डॉ. व्ही. के. पॉल म्हणाले, की लसींचे उत्पादन वाढविण्याचे प्रयत्न सुरू असून, आगामी काळात याचे परिणाम दिसू लागतील. भारत १७.५ कोटींहून अधिक डोस देणारा जगातील तिसरा मोठा देश आहे. हे यश देशात तयार होणाऱ्या लसींच्या आधारावर मिळविण्यात आले आहे, असे प्रत्युत्तर पॉल यांनी विरोधी पक्षांना दिले आहे.
अमेरिका हाच असा एकमेव देश आहे ज्याने, आतापर्यंत २५ कोटी लोकांना डोस दिलेले आहेत. चीनच्या आकडेवारीवर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. अमेरिकेने भारताच्या एक महिन्याआधीच लसीकरण सुरू केले होते. अमेरिकेसारख्या संपन्न देशाला १७ कोटी डोस देण्यासाठी ११५ दिवस लागले, तर मर्यादित साधनांचा उपयोग करून भारताने ११४ दिवसांत हा कारनामा करून दाखविला आहे.
कोरोनाच्या मृतांची आकडेवारी पाहिल्यास यामध्ये ८८ टक्के मृत तरुण आहेत. लसीकरणामुळे दुसऱ्या लाटेत तरुण वर्गाचा मृत्यू थांबविण्यास यश मिळाल्याचा दावा त्यांनी केला आहे. भारताने आतापर्यंत ३५.६ कोटी डोसच्या ऑर्डर दिल्या आहेत. त्यामध्ये २७.६ कोटी डोस कोविशिल्ड आणि आठ कोटी डोस कोवॅक्सिनचे आहेत.
जुलैपर्यंत या सर्व डोसचा पुरवठा करण्यात येणार आहे. राज्य सरकार आणि खासगी कंपन्यांनी जुलैपर्यंत केविशिल्ड आणि कोव्हॅक्सिनचे १६ कोटी डोसच्या ऑर्डर दिलेल्या आहेत. दोन्ही मिळून जुलैपर्यंत भारतात एकूण ५१.६ कोटी डोस उपलब्ध करण्यात येणार आहे. त्यात २५ कोटी लोकांना डोस दिले जाणार आहेत.
पाच नव्या लसींचे परीक्षण सुरू
डॉ. पॉल यांनी पाच नव्या लस आणि त्यांच्या संभाव्य उत्पादनाबाबतही माहिती दिली. या लसींचे परीक्षण विविध टप्प्यात सुरू आहे. यामध्ये बायोलॉजिकल ई ची सबयुनिट लस, जायडस- कॅडिलाची डीएनए लस, सीरम इन्स्टिट्यूटची नोवावॅक्स, भारत बायोटेकची नोजल लस, जिनोव्हाची एमआरएनए लस या लसींचा समावेश आहे.
झायडस-कॅडिलाची डीएनए लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील परीक्षण झालेले आहे. त्यांनी आपत्कालीन वापरासाठीही परवानगी मागितली आहे. परवानगी मिळाल्यास ऑगस्ट-डिसेंबरपर्यंत पाच कोटी डोसचा पुरवठा करण्यात येणार आहे. याचप्रमाणे बायोलॉजिकल ई च्या लसीचे तिसऱ्या टप्प्यात परीक्षण सुरू आहे. आपत्कालीन स्थितीत वापरण्यासाठी ते ३० कोटी डोसचा पुरवठा करू शकणार आहे. भारत बायोटेकच्या नोजल लसीचे १० कोटी डोस, सीरम इन्स्टिट्यूटच्या नोवाव्हॅक्सचे २० कोटी डोस, जिनोव्हाच्या एमआरएनए लसीचे सहा कोटी डोसचा पुरवठा करण्यात येणार आहे.