विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
संपूर्ण जगाच्या तुलनेत भारतात लसीकरणाचा वेग अतिशय संथ असतानाही भारतातील लसीकरणाची प्रक्रिया यावर्षी डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल, असा दावा केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केला आहे. आरोग्य मंत्रालयाने अलीकडेच १०८ कोटी लोकांना लसीचे २१६ कोटी डोस देण्यासाठी रोडमॅप सादर केला आहे, असेही जावडेकर म्हणाले. दरम्यान, राहुल गांधी यांनी मोदींवर केलेल्या आरोपालाही जावडेकर यांनी प्रत्युत्तर दिले.
राहुल यांनी आरोप करताना जी भाषा वापरली आहे आणि ज्यापद्धतिने त्यांनी लोकांना घाबरविण्याचा प्रयत्न केला आहे, त्यावरून टूलकिटच्या मागे काँग्रेसच होती, हे स्पष्ट होते, असा पलटवार जावडेकर यांनी केला. तसेच लसीकरण पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारला तीन वर्षांचा कालावधी लागू शकतो असेही विधान राहुल यांनी केले होते.
राहुल यांनी मोदींच्या प्रयत्नांना ‘नौटंकी‘ म्हणणे हे टूलकिल स्क्रिप्टचाच एक भाग आहे. त्यामुळे आमचा तर दावाच आहे की यामागे काँग्रेस आहे, असेही जावडेकर म्हणाले. या प्रकरणात पोलिसांकडून चौकशीची मागणी करण्यात आली आहे, असे स्पष्टीकरण काँग्रेसने दिले आहे.
गेल्या आठवड्यात केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी म्हटले होते की २०२१ च्या अखेरपर्यंत कमीत कमी सर्व वयोगटांचे लसीकरण झालेले असेल. त्यांनी असेही आश्वासन दिले होते की सध्यस्थितीत देशातील आरोग्य सोयी–सुविधांमध्ये सुधारणा करणे सुरू आहे. २१ मे ला कोरोनाच्या आढावा बैठकीदरम्यान डॉ. हर्षवर्धन यांनी सुद्धा डिसेंबरपर्यंत २१६ व्हॅक्सीन खरेदी केलेले असतील, असे म्हटले होते. जुलैपर्यंत ५१ कोटी डोज खरेदी केले जातील, असेही ते म्हणाले होते.
स्पुटनिक–व्ही जूनमध्ये
रूसमध्ये निर्मित स्पुटनिक–व्ही हे व्हॅक्सीन जूनमध्ये उपलब्ध होईल. देशातील अपोलो हॉस्पिटलच्या माध्यमातून देशात त्याचे एन्ट्री होईल. त्यामुळे देशात ज्या ज्या ठिकाणी अपोलो हॉस्पिटल आहे तेथे जूनच्या दुसऱ्या आठवड्यात हे व्हॅक्सीन लागायला सुरुवात होईल.