नवी दिल्ली – अॅम्वे, टप्परवेअर, ओरिफ्लेम यासारख्या डायरेक्ट सेलिंग (वस्तूंची थेट विक्री करणाऱ्या) कंपन्यांना केंद्र सरकारने जोरदार दणका दिला आहे. या कंपन्यांसाठी नवे नियम अधिसूचित केले आहेत. केंद्राने अशा कंपन्यांना रोख रकमेचा प्रसार करणाऱ्या योजनांना प्रोत्साहन देण्यापासून रोखले आहे. नव्या नियमांमुळे डायरेक्ट सेलिंग कंपन्या आता पिरॅमिड योजना चालवू शकणार नाहीत. अॅम्वे, टप्परवेअर आणि ओरिफ्लॅमसारख्या कंपन्याना आता ९० दिवसांच्या आत नव्या नियमांचे पालन करावे लागणार आहे. ग्राहकांकडून विक्री करण्यात आलेल्या उत्पादन आणि सेवांबाबच्या तक्रारीबद्दलही कंपन्यांचे उत्तरदायित्व असेल.
ग्राहक संरक्षण (थेट विक्री) नियम, २०२१ ची अधिसूचना ग्राहक संरक्षण मंत्रालयाने प्रसिद्ध केली आहे. ई-कॉमर्स कंपन्यांसह ग्राहकांना थेट वस्तू विक्री करणारे विक्रेतेही या नियमांच्या कक्षेत येणार आहेत. नव्या नियमांतर्गत डायरेक्ट सेलिंग कंपन्यांवर नजर ठेवण्याची जबाबदारी राज्य सरकारांवर देण्यात आली आहे. ग्राहक संरक्षण मंत्रालयाचे अधिकारी सांगतात, मंत्रालयाने प्रथमच डायरेक्ट सेलिंग उद्योगासाठी नियम तयार केले आहेत. अशा कंपन्यांनी नियमांचे उल्लंघन केले तर त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
पिरॅमिड योजना म्हणजे काय
पिरॅमिड योजना चालविणार्या या कंपन्या ग्राहकांना जोडून घेण्यासाठी वेगवेगळी स्वप्ने दाखवतात. संभाव्य ग्राहकांना आपल्यासोबत जोडण्यासाठी कागदपत्रांद्वारे पटवून देण्यात येते. ग्राहकांनी चार-पाच जणांना जोडले, त्या पाच जणांनी आणखी पंचवीस जणांना सोबत घेतले तर ही साखळी वाढेल. ही साखळी जितकी मोठी होईल, सर्वात वरच्या स्थानावर असलेल्या ग्राहकाची कमाई तितकीच वाढत जाईल.
पिरॅमिड योजनांतर्गत एखाद्या ग्राहकाने आपल्या खाली आणखी ग्राहकांची नियुक्ती केली तर त्याची कमाई वाढत जाते, असा लोभ एखाद्या व्यक्तिला दाखवला जातो. अशाने नियुक्त होणार्या ग्राहकांची संख्या वेगाने वाढत जाते. लवकरच नियुक्त्यांची संख्याही जवळपास संपते. पिरॅमिडच्या खालच्या स्तरावर असलेल्या ग्राहकाची कमाई खूपच कमी होते. किंवा नसल्यासारखीच होते. या योजनांमध्ये सहभाग घेण्यासाठी मोठे शुल्क वसूल केले जाते. त्यामध्ये प्रशिक्षण शुल्क, आवश्यक किट आणि सदस्यत्व शुल्काचा समावेश आहे.
नव्या नियमांमध्ये काय
डायरेक्ट विक्री कंपन्यांना सर्वप्रथम ग्राहकांकडे जाण्यासाठी पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे. विनाओळखपत्र कोणताही विक्रेता कोणत्याही ग्राहकाकडे जाणार नाही. कंपनीकडून पूर्ण न होणारे आश्वासन विक्रेता देऊ शकणार नाही. विक्रेत्याने कंपनीसोबत करार करणे आवश्यक आहे. विक्रेत्याला आपल्या डायरेक्ट सेल कंपनीचे नाव आणि पत्ता सांगावा लागेल. विक्रेत्याने ग्राहकाला विक्री, भरपाई, रिफंड किंवा इतर अटी-शर्ती सविस्तर सांगणे आवश्यक आहे. ग्राहकांना वास्तविक सामान मिळाले आहे की नाही हे विक्रेत्याने सुनिश्चित करावे. विक्रेता आपली खासगी माहिती कुठेही जाहीर करणार नाही.