इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना लवकरच नवीन वर्षाची भेट मिळणार आहे. अर्थ मंत्रालय, कार्मिक व प्रशिक्षण विभाग आणि खर्च विभागाच्या अधिकाऱ्यांची यासंबंधी लवकरच बैठक होणार आहे. त्यात महागाई भत्ता वाढीच्या प्रस्तावावर शिक्कामोर्तब केले जाणार आहे. सर्व कर्मचारी महागाई भत्त्यात वाढ होण्याची वाट पाहत आहेत. महागाई भत्ता वाढल्यानंतर तब्बल २० हजार रुपयांची पगारवाढ होण्याची चिन्हे आहेत. अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांक (AICPI-IW) डिसेंबर २०२१पर्यंत १२५ असेल तर मग महागाई भत्ता ३ टक्क्यांपर्यंत वाढू शकतो.
सध्या एकूण महागाई भत्ता ३१ टक्के आहे, जो ३४ टक्क्यांपर्यंत वाढू शकतो. तसे झाल्यास कर्मचाऱ्यांच्या पगारात २० हजार रुपयांपर्यंत वाढ होऊ शकते. त्याचबरोबर काही विभागातील कर्मचाऱ्यांना डिसेंबरअखेर पदोन्नतीही दिली जाते. याशिवाय, फिटमेंट फॅक्टरदेखील बजेटमध्ये ठरवले जाऊ शकते. मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाल्यानंतर त्याचा अर्थसंकल्पीय खर्चात समावेश केला जाणार आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, केंद्र सरकार महागाई भत्त्यात ३ टक्के वाढ करण्याची घोषणा करू शकते. ३ टक्के वाढीमुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात २० हजार रुपयांपर्यंत वाढ होऊ शकते. सातव्या केंद्रीय वेतन आयोगानुसार, सरकारी कर्मचाऱ्यांच्या डीएची गणना मूळ वेतनाच्या आधारे केली जाते. सध्या महागाई भत्ता ३१ टक्के आहे. तसेच, पगाराच्या एचआरएमध्येही सुधारणा करण्यात आली असून, सध्या एचआरएचे दर शहरी श्रेणीनुसार २७ टक्के, १८ टक्के व ९ टक्के असे आहेत. वाढत्या महागाई भत्त्यासह एचआरएमध्येही वाढ करण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला होता.