नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – केंद्राच्या कर्मचाऱ्यांना वाढीव महागाई भत्ता देण्याबाबत गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चा सुरु आहेत. या निर्णयावर कधी शिक्कामोर्तब होईल, याकडे केंद्राच्या कर्मचाऱ्यांचं लक्ष लागलं आहे. नव्या माहितीनुसार, होळीपर्यंत या निर्णयावर शिक्कामोर्तब होणार आहे.
केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना महागाई भत्ता देण्याच्या दिलासादायक निर्णयाबाबत गेल्या अनेक महिन्यांपासून ऊहापोह सुरु आहे. आतापर्यंत महागाई भत्त्याचा पॅटर्न बघितला तर होळीपर्यंत सहामाहीसाठी महागाई भत्ता जाहीर केला जातो. गेल्या वर्षी कोरोनामुळे भत्ता बंद करण्यात आला होता. मात्र, जुलै २०२१मध्ये तो पुन्हा जाहीर करण्यात आला. कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ३ टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. या वाढीनंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ३४ टक्क्यांपर्यंत वाढणार आहे. तसेच, पेन्शनधारकांच्या महागाई सवलतीमध्ये ३ टक्के वाढ झाल्यानंतर ३४ टक्क्यांपर्यंत वाढ होईल. महागाई भत्ता वाढल्यानंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांचे वेतन वाढणार आहे. त्याचबरोबर पेन्शनधारकांच्या पेन्शनमध्येही महागाई भत्त्याच्या माध्यमातून वाढ करण्यात होणार आहे. सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींनुसार, महागाई भत्ता आणि महागाई सवलत वर्षातून दोनदा वाढवली जाते. ही वाढ सहामाही आधारावर केली जाते. मात्र, सरकारच्या या निर्णयामुळे सुमारे ४८ लाख केंद्र सरकारचे कर्मचारी आणि ६५ लाखांहून अधिक निवृत्ती वेतनधारकांना फायदा होतो.