नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – देशातील बाजारपेठांमध्ये कांद्याचे भाव नियंत्रणात राहण्यासाठी केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. दरवर्षी उन्हाळ्याच्या प्रारंभी कांद्याचे दर कडाडतात. त्यामुळेच केंद्र सरकारने आता बफर स्टॉकमधील कांदा बाजारात आणण्यास प्रारंभ केला आहे. त्यामुळे किरकोळ बाजारातील कांद्याचे दर नियंत्रणात राहतील, अशी खात्री केंद्र सरकारला आहे.
देशभरात कांद्याचा पुरवठा वाढवण्यासाठी महाराष्ट्रातील लासलगाव आणि पिंपळगाव बसवंत या घाऊक बाजारातून मोठ्या प्रमाणात नाफेडने कांदा खरेदी केला. तोच कांदा बफर स्टॉक म्हणून ठेवला जातो. जेव्हा कांद्याचे दर वाढण्याची शक्यता असते तेव्हा हाच कांदा बाजारात आणला जातो. वेगवेगळ्या ठिकाणी साठवलेला कांदा २१ रुपये प्रति किलो रुपयाने राज्यांना वितरित करण्यात येत आहे. मदर डेअरीच्या विक्री केंद्रांवर वाहतुकीच्या खर्चासह २६ रुपये प्रतिकिलोच्या दराने भाज्यांचा पुरवठा केला जात आहे, असेही ग्राहक संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे.
मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, गेल्या काही आठवड्यांपासून किरकोळ कांद्याचे भाव हळूहळू वाढत आहेत. दिल्ली आणि चेन्नईमध्ये कांद्याचे भाव ३७ रुपये प्रतिकिलो होता. मुंबईमध्ये ३९ रुपये प्रतिकिलो तर कोलकातामध्ये ४३ रुपये प्रतिकिलो होता. उन्हाळ कांद्याची आवक स्थिर असून, मार्च २०२२ पासून रब्बी हंगामामधील पिक येईपर्यंत कांद्याची आवक स्थिर राहण्याची आशा आहे, असे ग्राहक संरक्षण मंत्रालयाने सांगितले. या वर्षी १७ फेब्रुवारीपर्यंत कांद्याचे अखिल भारतीय सरासरी किंमत गेल्या वर्षीच्या तुलनेत २२.३६ टक्क्यांनी कमी होती. किंमत स्थिरीकरण निधी (पीएसएफ) च्या माध्यमातून प्रभावी बाजार हस्तक्षेपामुळे २०२१-२२ दरम्यान कांद्याचे भाव बऱ्याच प्रमाणात स्थिर राहिले आहेत. अशाचप्रकारे बटाट्याचे अखिल भारतीय सरासरी किरकोळ दर गेल्या महिन्याच्या तुलनेत १७ फेब्रुवारीला ६.९६ टक्के कमी म्हणजेच २०.५८ रुपये प्रतिकिलो होते.
आंध्र प्रदेश, आसाम, ओडिशा, तामिळनाडू, तेलंगण आणि पश्चिम बंगाल या राज्यांनी आगाऊ स्वरूपात कांदा खरेदी केला आहे. त्यासाठी केंद्राकडे १६४.१५ कोटी रुपये केंद्राकडे दिले आहेत. या राज्यांकडे आवश्यक खाद्यपदार्थ आणि वस्तूंच्या किमती नियंत्रित करण्यासाठी आवश्यक हस्तक्षेप करण्यासाठी निधी आणि आदेश आहे. गेल्या एका महिन्यापासून टोमॅटोच्या भावात घट झाली आहे. परंतु गेल्या वर्षीच्या तुलनेत थोडे जास्त आहेत. एक फेब्रुवारीपर्यंत टोमॅटोच्या अखिल भारतीय सरासरी किंमत २६.६९ रुपये प्रतिकिलो होती. गेल्या महिन्याच्या तुलनेत ही कमीच आहे. उत्तर भारतात आवक वेगाने वाढण्यास सुरुवात झाल्यावर आगामी आठवड्यांमध्ये किमती घटतील. दक्षिण भारतात आगामी आठवड्यात आवक वाढण्याची शक्यता आहे.