विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
कोरोना महामारीत रुग्णवाढीचा भीतीदायक वेग पाहता ज्या भागात संसर्ग वाढला आहे, तिथे संसर्गाची साखळी तोडण्यासाठी १४ दिवसांचा कठोर लॉकडाउन लावला जावा, अशा सूचना केंद्र सरकारने राज्य सरकारांना केल्या आहेत. तसेच १० टक्क्यांहून अधिक संसर्गाचा दर असलेल्या भागांची माहितीही गोळा करावी, अशा सूचना करण्यात आल्या आहेत. संबंधित ठिकाणी स्थानिक लॉकडाउन लावला जाऊ शकतो. उत्तर प्रदेश सरकारने शुक्रवारी सायंकाळीपासून मंगळवार सकाळी सात वाजेपर्यंतच्या लॉकडाउनचा कालावधी वाढवून तो ६ मेपर्यंत सकाळी सात वाजेपर्यंत करण्यात आला आहे. चंदीगडमध्येही ११ मेपर्यंत लॉकडाउन लावण्यात आला आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सोमवारी (३ मे) देशातील कोरोना परिस्थितीची माहिती दिली. ज्या भागात कोरोनारुग्णांची संख्या अधिक आहे तिथे लॉकडाउन लावावा. परंतु पूर्ण राज्यात किंवा जिल्ह्यात लॉकडाउन लावण्याची शिफरस, केंद्र सरकारने केलेली नाही. आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, देशात २५० जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग दर १० टक्के किंवा त्याहून अधिक आहे. गेल्या आठवडाभरात या जिल्ह्यातील परिस्थिती सुधारली आहे. नव्याने रुग्णसंख्या वाढत असलेल्या जिल्ह्यांची ओळख पटविण्याच्या सूचनाही करण्यात आल्या आहेत. अनेक जिल्ह्यांमधील एक गाव किंवा त्यातील भाग कोरोनाग्रस्त आढळला आहे. परंतु इतर ठिकाणी संसर्गाचा एकही रुग्ण आढळलेला नाही. अशा परिस्थितीत संपूर्ण जिल्ह्यात लॉकडाउन लावण्याऐवजी संसर्गग्रस्त गावात किंवा परिसरात १४ दिवसांचा लॉकडाउन लावावा, अशा सूचना करण्यात आल्या आहेत.
२२ राज्यात संसर्गाचा दर १५ टक्के
कोरोनाची दुसरी लाट ओसरू लागल्याचे संकेत मिळाल्याचा दावा आरोग्य मंत्रालयाकडून करण्यात आला आहे. परंतु संसर्गाच्या दराचा विचार केल्यास अजूनही २२ राज्यांमध्ये १५ टक्क्यांहून अधिक संसर्गाचा दर आहे. नऊ राज्यात ५ ते १५ टक्के आणि फक्त पाच राज्यात ५ टक्क्यांहून कमी आहे. जागतिक आरोग्य संघटनेनुसार, पाच टक्के संसर्गाचा दर सहजरित्या नियंत्रणात आणला जाऊ शकतो.
कर्नाटकात ऑक्सिजनविना २४ मृत्यू
कर्नाटकच्या चामराजनगरमध्ये ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे २४ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये २३ कोरोनाचे आणि इतर आजारांचे रुग्ण होते. सगळ्याच कोरोनाग्रस्तांचे व्हेंटिलेटरवर उपचार सुरू होते असे बोलले जात आहे. परंतु सरकारने ऑक्सिनच्या तुटवड्याचा इन्कार केला आहे.