नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या कॅबिनेट समितीच्या बैठकीत आज केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या महागाई भत्त्यात तसेच निवृत्त कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या महागाई दिलासा निधीत, एक जुलै २०२१ पासून २८ टक्क्यांपर्यंत वाढ करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. सध्या असलेल्या मूळ वेतन/पेन्शनच्या १७ टक्के इतका महागाई भत्ता/दिलासा कर्मचाऱ्यांना मिळत होता, त्यात या निर्णयाने ११ टक्क्यांची वाढ झाली आहे.
कोविडमुळे निर्माण झालेली अभूतपूर्व परिस्थिती लक्षात घेऊन, महागाई भत्त्याचे तसेच महागाई दिलाशाचे तीन हप्ते, जे १ जानेवारी२०२०,१ जुलै २०२० आणि १ जानेवरी २०२१ ला देय होते, ते देण्यात आले नव्हते.
आता सरकारने केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई हप्ता आणि निवृत्त कर्मचाऱ्यांना महागाई दिलासा, १ जुलै २०२१ पासून देण्याचा निर्णय घेतला आहे. ही वाढ २८ टक्क्यांपर्यंत केली जाणार आहे. ही वाढ, आधीच्या तीन देय वाढीशी सुसंगत आहे. मात्र, १ जानेवारी २०२० ते ३० जून २०२१ या कालावधीतील महागाई हप्ता/दिलासा १७ टक्के एवढाच कायम राहणार आहे.