मनीष कुलकर्णी, नवी दिल्ली
आगामी काळात पदवीधर होऊ इच्छिणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे वृत्त आहे. कारण, सद्यस्थितीत असलेली पदवीची सर्वसाधारणपणे तीन वर्षे आता यापुढे राहणार नाहीत. हो, यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने तसा ठोस निर्णय घेतला आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने यासंदर्भात सर्व विद्यापीठांच्या कुलगुरुंना एका निर्देश पाठविले आहेत.
देशातील केंद्रीय विद्यापीठांसह सर्व विद्यापीठांमधील पदवी अभ्यासक्रमाच्या कालावधीबाबत विद्यापीठ अनुदान आयोग (यूजीसी) चर्चा करत आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडूनही विद्यापीठांच्या सर्व कुलगुरूंना सूचना पाठविण्यात आल्या आहेत.
वेगळा अभ्यासक्रम
देशातील सर्व ४५ केंद्रीय विद्यापीठांनी आता तीनऐवजी चार वर्षांच्या पदवी आणि दोन वर्षांच्या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाबाबत विचार सुरू करावा. जेणेकरून तो लागू करण्याची प्रक्रिया सुरू केली जाऊ शकेल, असे शिक्षण मंत्रालयाने म्हटले आहे. हा अभ्याक्रम गेल्या वेळी २०१३ मध्ये सुरू करण्यात आलेल्या चार वर्षीय पदवी अभ्यासक्रमापेक्षा वेगळा असेल. या वर्षी अनेक केंद्रीय विद्यापीठांना त्यांच्या नियमित तीन वर्षांच्या पदवी कार्यक्रमाला संचालित करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
मल्टिपल एन्ट्री अँड एक्झिटचा पर्याय
अभ्यासक्रमासोबतच मल्टिपल एन्ट्री अँड एक्झिटची प्रणाली लागू केली जाणार आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमात अनेक वेळा प्रवेश घेण्याचा तसेच अभ्यासक्रमातून बाहेर पडण्याचा पर्याय उपलब्ध असेल. यंदा नव्या शिक्षण धोरणानुसार तीन वर्षांचा पदवी अभ्यासक्रम आणि पर्यायी चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम उपलब्ध असेल. त्याचप्रमाणे दोन आणि एका वर्षाचा पदवी पदव्योत्तर अभ्यासक्रमही उपलब्ध असेल, अशी माहिती केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिली.
विद्यापीठांना सूचना
हा अभ्यासक्रम कसा लागू करायचा याची स्वायत्तता सर्व विद्यापीठांना देण्यात आली आहे. पुढील वर्षापर्यंत सर्वांनी या प्रक्रियेचा निर्णय घ्यायला हवा. या मुद्द्यावर केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने सर्व कुलगुरूंची बैठकही घेतलेली आहे. दिल्लीसह अनेक विद्यापीठांमध्ये आगामी सत्रात चार वर्षांचा अभ्यासक्रम लागू करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे, असेही धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितले.