नवी दिल्ली – ऑस्ट्रेलियाचे माजी पंतप्रधान आणि विशेष व्यापार दूत टोनी एबॉट यांच्या नेतृत्वाखालील उच्च स्तरीय प्रतिनिधी मंडळाने काल केंद्रीय कोळसा, खाण आणि संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांची भेट घेतली. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातला व्यापार आणि आर्थिक संबंध व्यापक करण्यासाठी विशेषकरून भारताच्या उर्जा गरजा आणि महत्वाकांक्षी धोरण कार्यक्रमाला सहाय्य करण्यासाठी ऑस्ट्रेलियन संसाधनाच्या उपयोगासह उर्जा क्षेत्राच्या विकासाबाबत या भेटीमध्ये चर्चा झाली. एबॉट यांच्यासह ऑस्ट्रेलियाचे उच्चायुक्त बॅरी ओ’ फारेल, आणि ऑस्ट्रेलियन उच्चायोगाचे आर्थिक सल्लागार ह्युग बॉयलन यांचाही या प्रतिनिधी मंडळात समावेश होता.
मंत्र्यांनी, सध्याच्या धोरणा अंतर्गत कोळसा क्षेत्र खुले करण्याविषयी प्रतिनिधी मंडळाला माहिती दिली. भारतात उर्जेचा महत्वाचा स्त्रोत म्हणून कोळश्याचे महत्व अधोरेखित करत भारतात कोळसा उत्पादनात वृद्धी करण्यासाठी प्रोत्साहन देण्यावर सरकारचा भर असल्याचे त्यांनी सांगितले. भूपृष्ठावर आणि भूमिगत कोळसा गॅसीफिकेशनसाठी आणि कोल बेड मिथेन काढणे यासारख्या क्षेत्रात तंत्रज्ञान सामायिक करण्यासाठी सहकार्य करण्याची विनंती त्यांनी यावेळी केली. भारतात इलेक्ट्रोनिक वाहन निर्मितीसाठी महत्वाच्या आणि धोरणात्मक खनिजांचा स्त्रोत म्हणून ऑस्ट्रेलियाचे महत्व मंत्रांनी अधोरेखित केले. कोळसा मंत्रालयाचे सचिव डॉ.अनिलकुमार जैन, सचिव, खाण मंत्रालय सचिव आलोक टंडन आणि दोन्ही मंत्रालयांचे इतर वरिष्ठ अधिकारी चर्चेत सहभागी झाले.