इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – महागाईमुळे सर्वसामान्यांना आयुष्य जगणं कठीण झालेले असताना त्यात सिमेंटच्या किमती वाढणार असल्याच्या वृत्ताने सामान्य माणसाला धक्का बसणार आहे. इंडिया सिमेंटने सिमेंटच्या प्रतिगोणीचे भाव ५५ रुपयांपर्यंत वाढविण्याचे नियोजन केले आहे. ही वाढ एकदम केली जाणार नसून, टप्प्या-टप्प्याने केली जाणार आहे, अशी माहिती इंडिया सिमेंटचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक एन. श्रीनिवासन यांनी दिली आहे.
इंडिया सिमेंटतर्फे सिमेंटच्या एका गोणीच्या दरात १ जून रोजी २० रुपये, १५ जून रोजी १५ रुपये आणि १ जुलै रोजी २० रुपयांनी वाढ केली जाणार आहे, असे श्रीनिवासन यांनी म्हटले आहे. इतर कंपन्यांशी आमची तुलना करू नका. सिमेंटचे उत्पादन करण्याचा खर्च वाढला आहे. त्यामुळे आम्हाला काही पावले उचलावी लागत आहेत. असे न केल्यास कंपनीसा मोठे नुकसान सोसावे लागेल. असे सांगत त्यांनी सिमेंटचे दर वाढविण्याचे समर्थन केले आहे.
केंद्र सरकारच्या ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स या ऑनलाइन व्यासपीठाच्या माध्यमातून गुगल कंपनी ई-कॉमर्सच्या बाजारात उतरण्याची तयारी करत आहे. गेल्या महिन्यात काही शहरांमध्ये ओएनडीसीचे महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून अनावरण करण्यात आले आहे. खरेदी केलेल्या सेवा या व्यासपीठाशी जोडण्याचा प्रयत्न गुगलकडून केला जात आहे. गुगलच्या या निर्णयामुळे अॅमेझॉन फ्लिपकार्ट यासारख्या ऑनलाइन कंपन्यांना आव्हान मिळण्याची शक्यता आहे. गुगलकडून अनेक कंपन्यांशी संपर्क साधण्यात आल्याची माहिती ओएनडीसीचे सीईओ टी. कोशी यांनी दिली आहे.