मुंबई – एकामागोमाग एक सेलिब्रिटींच्या मृत्यूमुळे केवळ मायानगरीतच नव्हे तर एकूणच समाजात अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. सेलिब्रिटींना हार्ट अटॅक का येतो, त्यांना कर्करोग कश्यामुळे येतो, असेही प्रश्न निर्माण झाले आहेत. विशेषतः सेलिब्रिटींमध्ये या दोन आजारांचे वाढते प्रमाण आता चिंतेचा विषय ठरत आहे.
40 वर्षाच्या सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यूमुळे फिटनेस कॉन्शस कलावंतांच्या जीवनशैलीबाबत विशेष चर्चा होऊ लागले आहे. सिद्धार्थ आपल्या फिटनेसच्या बाबतीत प्रचंड कॉन्शस होता, तरीही त्याला हार्ट अटॅक आला आणि त्यात त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे नेमक्या कारणांचा शोध घेतला जात आहे. ऋषी कपूर, इरफान खान यांना कर्करोगाने गाठले होते. सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केली. पण सुशांत डिप्रेशनमध्ये होता, असे सांगितले जाते. सुप्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक रेमो डिसोझा याला अलीकडेच ह्रदयविकाराचा एक तीव्र धक्का बसला होता.
फिटनेस म्हणजे नेमके काय?
सेलिब्रिटींमध्ये स्वतःला इंडस्ट्रीतील स्पर्धेत टिकवून ठेवण्यासाठी जीममध्ये घाम गाळण्याची एक वेगळी स्पर्धा सुरू असते. पण तंदुरुस्त राहण्यासाठी केवळ शारीरिक नव्हे तर मानसिक फिटनेसही तेवढाच आवश्यक आहे. रात्री उशिरापर्यंत काम करीत राहणे, दारु पिणे, ड्रग्स घेणे, कामाचा ताण आल्यामुळे झोप न येणे हे सेलिब्रिटींचे दैनंदिन शेड्यूल आहे. ही सारी कारणे ह्रदयविकाराला आमंत्रण देणारी ठरू शकतात, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
ह्रदयरोगाचा धोका का वाढतो?
काही वर्षांपूर्वीपर्यंत ह्रदयरोग हा वाढत्या वयामुळे उद्भवणारा रोग समजला जायचा. पण गेल्या काही वर्षांमध्ये कमी वयाच्या लोकांमध्येही ह्रदयरोगाचे प्रमाण वाढलेले आहे. यात फिटनेस आणि लुकसाठी कॉन्शस असलेले सेलिब्रिटीही सामील आहेत. त्यांची जीवनशैली खराब करण्यात दारुचा व धुम्रपानाचा अतिरेकही कारणीभूत समजला जातो. याशिवाय झोप पूर्ण न होणे आणि खाण्या-पिण्यात कोलेस्ट्रॉल जास्त असलेले पदार्थ घेणे ह्रदयरोगाचा धोका वाढवतात.
व्यायामाचा अतिरेक
तज्ज्ञ म्हणतात की व्यायामाचा अतिरेक व्हायला नको. खूप जास्त व्यायाम प्रकृतीसाठी धोकादायक आहे. व्यायामादरम्यान ब्लड प्रेशर अधिक वाढते आणि खूप वेळ व्यायाम केल्याने ह्रदयरोगाला आमंत्रण दिले जाऊ शकते, असेही तज्ज्ञ म्हणतात.