मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कम्बाइंड डिफेन्स सर्व्हिसेस (सीडीएस) परीक्षेच्या पूर्व तयारीसाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे राज्य शासनातर्फे १ फेब्रुवारी ते ९ एप्रिल २०२३ या कालावधीत सीडीएस अभ्यासक्रम – (क्र. ६०) चे आयोजन करण्यात आले आहे. या अभ्यासक्रमासाठी मुंबई शहर जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी १ व २ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी १० ते दुपारी ३ या कालावधीत मुलाखतीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, मुंबई शहर येथे उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, मुंबई शहर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये केले आहे.
केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे कोणत्याही शाखेच्या पदवीधर उमेदवारांसाठी १६ एप्रिल २०२३ रोजी घेण्यात येणाऱ्या सीडीएस या संरक्षण दलातील अधिकारी पदाच्या परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची अंतिम मुदत १० जानेवारी २०२३ अशी होती. या परीक्षेची पूर्व तयारी करून घेण्यासाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे राज्य शासनातर्फे कोर्सचे आयोजन करण्यात आले आहे. या कोर्ससाठी प्रशिक्षणार्थींची निवास, भोजन आणि प्रशिक्षणाची नि:शुल्क सोय करण्यात आली आहे.
मुंबई शहर जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीसाठी येताना त्यांनी फेसबुक/वेब पेजवर डिपार्टमेंट ऑफ सैनिक वेल्फेअर, पुणे (डीएसडब्ल्यू) सर्च करून त्यातील सीडीएस- ६० कोर्ससाठी प्रवेशपत्र व त्यासोबत असलेल्या परिशिष्टांची प्रिंट घेऊन व ते पूर्ण भरून सोबत आणणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक (दूरध्वनी क्रमांक ०२५३- २४५०३२) येथे कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष किंवा दूरध्वनीवरून संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
CDS Exam Preparation Candidates Appeal