नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – तिन्ही सुरक्षा दलांचे प्रमुख (सीडीएस) बिपीन रावत यांना घेऊन जाणाऱ्या एमआय-१७ हेलिकॉप्टर दुर्घटनेचा चौकशी अहवाल संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना सुपूर्द केला आहे. चौकशी अहवालाच्या तथ्यांबद्दल अद्याप अधिकृतरित्या कोणतीही माहिती देण्यात आली नाही. परंतु सूत्रांच्या माहितीनुसार, अचानक हवामान खराब झाल्याने चालकाने हेलिकॉप्टरवरील नियंत्रण गमावले. परिणामी हेलिकॉप्टर कोसळले. चौकशी अहवालात कोणत्याही प्रकारचा तांत्रिक बिघाड किंवा हल्ल्याची शक्यता फेटाळून लावली आहे.
ही दुर्घटना गेल्या वर्षी ८ डिसेंबरला झाली होती. या हेलिकॉप्टरमध्ये सीडीएस बिपीन रावत, त्यांची पत्नी मधुलिका रावत यांच्यासह एकूण १४ जण होते. दुर्घटनेत सर्व प्रवाशांचा मृत्यू झाला होता. हवाई दलाच्या चौकशीत काढण्यात आलेल्या निष्कर्षाबद्दल संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना सूचित करण्यात आले. एअर मार्शल मानवेंद्र सिंह यांनी दुर्घटनेच्या कोर्ट ऑफ इन्क्वायरीचे नेतृत्व केले.
दुर्घटनेचे नेमके कारण
अधिकार्यांच्या माहितीनुसार, चौकशी दलाने रशियामध्ये तयार झालेल्या एमआय-१७ व्ही ५ हेलिकॉप्टरच्या दुर्घटनेसंदर्भातील चौकशी पूर्ण केली आहे. भारतीय हवाई दलाच्या हेलिकॉप्टरमध्ये कोणताही तांत्रिक बिघाड झाला नाही. अचानक ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने हेलिकॉप्टर अनियंत्रित झाले. दुर्घटनेदरम्यान कंट्रोल्ड फ्लाइट इनटू टेरिन (सीएफआयटी) स्थितीचा वापर करण्यात आला. हवामान खराब झाल्यानंतर सर्वसाधारणपणे पायलट रस्ता भरकटतात. त्यामुळे विमान अथवा हेलिकॉप्टर पर्वत, जमीन, झाडे किंवा इतर गोष्टींवर आदळून दुर्घटनाग्रस्त होतात. असाच प्रकार या दुर्घटनेत झाला असल्याचे चौकशी अहवालात म्हटले आहे.