विजय वाघमारे, जळगाव
जळगाव माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी सर्वप्रथम एका माजी मंत्र्यांच्या पीएची अश्लील सीडीबाबत धक्कादायक वक्तव्य केले होते. त्यानंतर आता चक्क ‘ती’ सीडी सहा महिन्यांपूर्वी पोलिसांकडे दिली आहे. एवढेच नव्हे तर त्याबाबत चौकशी सुरु असल्याचे सांगून खडसेंनी पुन्हा एकदा खळबळ उडवून दिलीय. परंतू पुणे येथील गुन्हे अन्वेषण विभागाने माझा मित्र आणि नातेवाईकाकडे छापा टाकून ‘ती’ सीडी मिळविण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप प्रफुल्ल लोढा यांनी काही महिन्यांपूर्वी केला होता. तर दुसरीकडे आतापर्यंत तीन लोकांनी सीडी आपल्याकडे असल्याचा दावा केला आहे. जाणून घ्या…’त्या’ कथित अश्लील सीडीबाबत आतापर्यंतच्या सर्व घडामोडी !
काय म्हणाले होते खडसे आणि लोढा
एका माजी मंत्र्यांच्या पीएच्या अश्लील व्हिडीओ क्लिपची सीडीबाबत सर्वात प्रथम एकनाथराव खडसे यांनी जाहीर वक्तव्य केले होते. या सीडीबाबत विचारायचे असेल तर जामनेरच्या प्रफुल्ल लोढा यांना विचारा असे वक्तव्य करून खडसे यांनी खळबळ उडवून दिली होती. यानंतर राष्ट्रवादीचे प्रफुल्ल लोढा यांनी यांनी ‘द क्लिअर न्यूज’ला दिलेल्या एक्सक्ल्युझिव्ह मुलाखतीत ‘त्या’ अश्लील व्हिडीओ क्लिपसह अनेक गंभीर गोष्टींवर धक्कादायक खुलासे केले होते. ‘त्या’ क्लिप विदेशात सुरक्षित आहेत. त्यामुळे माझ्या शरीराचे तुकडे-तुकडे केले तरी पापाचा घडा फुटेलच. मला ब्लॅकमेलिंग करायचे राहिले असते तर जनतेसमोर तथ्य मांडली नसती. रात्रीच्या अंधारात चिरीमिरी घेऊन शांत बसलो असतो. परंतू मला अनैतिक प्रवृत्ती संपवायची आहे. अगदी त्यांच्यात हिंमत असेल तर मी त्यांच्या घराच्या गच्चीवर सुद्धा समोरा-समोर चर्चा करायला तयार आहे. त्यामुळे मला त्रास दिला तर अशा गोष्टी उघड करेल की महाराष्ट्र हादरेल, अशा शब्दात प्रफुल्ल लोढा यांनी माजी मंत्री गिरीश महाजन यांच्यासह त्यांचे समर्थक रामेश्वर नाईक यांना इशारा दिला होता.
मित्र आणि नातेवाईकाकडे छापेमारीचा लोढा यांचा आरोप
गिरीश महाजन व रामेश्वर नाईक यांच्या कथित गैरकृत्याची फाईल व सीडी मिळविण्यासाठी बीएचआर पंतसंस्थेचा चौकशीचा बहाणा करून पुणे येथील गुन्हे अन्वेषण विभागाने एकनाथराव खडसे यांच्या दबावाने आपले मित्र व माझ्या चुलत भावाच्या घरावर धाड टाकली, असा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रफुल्ल लोढा यांनी ऑगस्ट २०२० मध्ये एका पत्रकार परिषदेत केला होता.
सिल्लोड आणि मुंबईला छापेमारी
प्रफुल्ल लोढा यांनी आरोप करताना पुढे म्हटले होते की, बीएचआरशी आपला संबंध नाही, मात्र त्यांचा बहाणा करून माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या दबावामुळे पुणे येथील गुन्हे अन्वेषण विभागाच्या पदाधिकाऱ्यांनी माझे मित्र सुनील कोचर आणि मुबंईला माझे चुलत भावाचे लोढा भवन येथे झाडाझडती घेतली. न्यायालयाची कोणतीही परवानगी नसताना पारस ललवाणी यांना घेऊन सिल्लोड येथे सुनील कोचर यांच्या घराची झडती घेतली. महाजन व नाईक यांच्यासंबंधी सीडी मिळविण्यासाठी हा प्रकार केल्याचा आरोप लोढा यांनी केला होता.
सीडी आपल्याकडेही आहेत ; अॅड विजय पाटील यांचा दावा !
माजी मंत्री गिरीश महाजन यांनी आपला छळ केला आहे. तीन वर्षापूर्वी ते मंत्री असल्याने त्यांचा दबाव होता. त्यामुळे पोलीसांनी आपली तक्रार घेतली नसती याची आपल्याला जाणीव होती. त्यामुळे आज गुन्हा दाखल केला आहे. मात्र या सर्व गुन्ह्याचे आपल्याकडे पुरावे आहेत. एवढेच नव्हे तर त्यांच्या कृत्याच्या आपल्याकडे ‘सीडी’आहेत वेळ आल्यास आपण त्याही दाखविणार आहोत. असे इशारा तक्रारदार अॅड विजय भास्कर पाटील यांनी डिसेंबर २०२० मध्ये जळगावात एका पत्रकार परिषदेत दिला होता. माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या ‘सीडी’असल्याची जोरदार चर्चा जिल्ह्यासह राज्यात सुरु असतांना त्याबाबत बोलतांना विजय पाटील म्हणाले होते, की आमच्याकडे महाजनांच्या विरूद्धचे सर्व पुरावे आहेत. त्यांच्या चर्चेत असलेल्या ती सीडी तसेच पेन ड्राईव्ह आहेत. वेळप्रसंगी आपण तेही दाखविणार आहोत, असे सांगून अॅड. विजय पाटील यांनी देखील प्रचंड खळबळ उडवून दिली होती.
खडसेंनी सीडी पोलिसांकडे दिली की छापेमारीत सापडली?
गैरकृत्याच्या सीडीबाबत जामनेरचे प्रफुल्ल लोढा यांच्या सर्व माहिती आहे. परंतू मध्यंतरी त्यांनी पुणे येथील गुन्हे अन्वेषण विभागाने सीडी मिळवण्यासाठी धाड टाकून आपले मित्र आणि नातेवाईकाकडे धाड टाकल्याचा आरोप केला होता. दरम्यान, या छापेमारीत पोलिसांनी लॅपटॉप,पेन ड्राईव्ह आणि हार्ड डिक्स जप्त केल्याची चर्चा होती. तर या तिघांपैकी एका वस्तुत त्या गैरकृत्याच्या सीडीतील व्हिडीओ सापडल्याची चर्चा रंगली होती. परंतू या चर्चेच्या सत्यतेबाबत अद्यापही अधिकृत कुणाकडे काहीही माहिती नाहीय. परंतू आता खडसे यांनी सीडी पोलिसांकडे दिल्याचे सांगितल्यामुळे काही प्रश्न उपस्थित झाले आहेत. लोढा यांनी पोलिसांनी छापेमारी केल्याचा आरोप केला तर खडसे यांनी ती सीडी पोलिसांकडे दिल्याचे म्हटले आहे. त्यामुळे खडसेंनी सीडी पोलिसांकडे दिली की छापेमारीत सापडली?, असा प्रश्न सध्या उपस्थित झाला आहे. दरम्यान, एवढेच नव्हे तर खडसेंनी ती सीडी नेमक्या कोणत्या पोलिसांकडे दिलीय? याबाबत कुणाकडेही निश्चित माहिती नाहीय. परंतू खडसेंनी ती सीडी पुणे पोलिसांकडे दिली असल्याची चर्चा जळगावात सुरू आहे.