नाशिक – घाण व कचऱ्यामुळे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी गोविंदनगर ते उंटवाडीपर्यंत नंदिनी नदीकिनारी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत, अशी मागणी शिवसेना, सत्कार्य फाऊंडेशनने केली आहे. महापालिका आयुक्त कैलास जाधव यांना याबाबतचे निवेदन ७ डिसेंबर २०२१ रोजी देण्यात आले आहे.
शिवसेना, सत्कार्य फाऊंडेशनच्या प्रयत्नाने नंदिनी नदीवरील दोंदे पूल आणि सिटी सेंटर मॉल सिग्नलजवळील गोविंदनगरकडे जाणाऱ्या पुलावर महापालिकेने संरक्षक जाळी बसविण्यास सुरुवात केली आहे. प्रदूषण रोखण्याच्या दृष्टीने ही महत्त्वाची उपाययोजना ठरणार आहेच. त्याबद्दल महापालिका आयुक्तांचे रहिवाशांनी आभार मानले आहेत. गोविंदनगर ते उंटवाडीतील दोंदे पूलापर्यंत नंदिनी नदीकाठचा संपूर्ण भाग रहिवाशी आहे. नागरिक रात्री-बेरात्री, दिवसासुद्धा छुप्या मार्गाने आणि छुप्या पद्धतीने नदीत घाण व कचरा टाकतात.
मटण, चिकन व्यावसायिक मांसही टाकतात. बांधकामाचे डेब्रीजही टाकले जाते. यामुळे पाण्याचा प्रवाह थांबतो. ठिकठिकाणी डबके साचते. वेळोवेळी परिसरात अस्वच्छतेमुळे दुर्गंधी पसरते. डासांचा प्रादुर्भाव वाढतो. परिणामी, नागरिकांचे आरोग्य धोक्यात येते. नंदिनीचे प्रदूषण रोखण्यासाठी घाण व कचरा टाकण्याला प्रतिबंध बसणे आवश्यक आहे. यासाठी या भागाची पाहणी करावी, आवश्यक त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, अशी विनंती करण्यात आली आहे. यामुळे गोविंदनगर, बाजीरावनगर, हेडगेवारनगर, उंटवाडी, जगतापनगर, तिडकेनगर, कर्मयोगीनगर येथील परिसर स्वच्छ राहण्यास मदत होईल, असे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.
दै. ‘सामना’चे पत्रकार, सत्कार्य फाऊंडेशनचे अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड (देशमुख), शिवसेना कार्यकर्त्या चारुशिला गायकवाड (देशमुख), बाळासाहेब मिंधे, मयुर आहेर, धवल खैरनार, संगिता देशमुख, प्रभाकर खैरनार, रवींद्र सोनजे, दिलीप दिवाणे, श्याम अमृतकर, निलेश ठाकुर, शैलेश महाजन, श्रीकांत नाईक, मनोज वाणी, विनोद पोळ, डॉ. शशिकांत मोरे, डॉ. राजाराम चोपडे, ज्योती वडाळकर, वंदना पाटील, सरीता पाटील, मीना टकले, सुनीता उबाळे, संगिता नाफडे, सचिन राणे, यशवंत जाधव, बापू आहेर, बाळासाहेब तिडके, नितीन तिडके, आनंदा तिडके, गोपाळ तिडके, आशुतोष तिडके, परेश येवले, राहुल काळे, मनोज पाटील, अनंत संगमनेरकर, पुरुषोत्तम शिरोडे, मकरंद पुरेकर, दीपक ढासे, समीर सोनार, मोहन पाटील, प्रथमेश पाटील, संकेत गायकवाड (देशमुख) आदींसह रहिवाशांनी ही मागणी केली आहे.