मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- राज्यात महत्त्वाच्या ठिकाणी विविध विभागांमार्फत सीसीटीव्ही कॅमेरे लावले जातात. विशेषतः गृह आणि आपत्ती निवारण विभागाला याची अधिक आवश्यकता भासते. तथापि, सीसीटीव्हीचे फुटेज कुणाला उपलब्ध करुन द्यावे, याबाबतची आदर्श कार्यप्रणाली तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृह विभागाला दिले असल्याची माहिती गृह राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी विधानपरिषदेत दिली.
सदस्य सतेज उर्फ बंटी पाटील यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. तर सदस्य अशोक उर्फ भाई जगताप यांनी या अनुषंगाने झालेल्या चर्चेत सहभाग घेतला.
राज्यमंत्री डॉ. भोयर म्हणाले, खासगी आस्थापनांमधील सीसीटीव्हीचे फुटेज बाहेर दिले जाऊ नये, याबाबत पुढील अधिवेशनापूर्वी धोरण तयार केले जाईल. त्याचप्रमाणे शासकीय आस्थापनांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविल्यानंतर त्याची देखभाल दुरुस्ती करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीमार्फत निधी उपलब्ध करून देण्याचे निर्देश, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.