नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– मुख्य आयुक्त निधी खरे आणि आयुक्त अनुपम मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने (CCPA) आदेश जारी करत ग्राहक संरक्षण कायदा, 2019 च्या उल्लंघन संदर्भात काही संस्थांना दंड ठोठावला आहे. केंद्रीय लोकसेवा आयोग – नागरीसेवा परिक्षा (UPSC CSE) 2022 आणि 2023 च्या निकालांबाबत दिशाभूल करणारे दावे प्रसिद्ध केल्याबद्दल वाजिराव अँड रेड्डी इन्स्टिट्यूट आणि स्टडीआयक्यू आयएएस यांना प्रत्येकी 7 लाख रुपये आणि एज आयएएस यांना अनुक्रमे 1 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. ग्राहकांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी तसेच हक्क संरक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि ग्राहक संरक्षण कायदा, 2019 च्या तरतुदींचे उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही प्रकारची वस्तू किंवा सेवांसाठी खोट्या किंवा दिशाभूल करणाऱ्या जाहिराती केल्या जाणार नाहीत याची सुनिश्चिती करण्यासाठी अशा प्रकारची कारवाई केली आहे
वाजिराव अँड रेड्डी इन्स्टिट्यूटने त्यांच्या जाहिरातीत खालील दावे केले आहेत-
“केंद्रीय लोकसेवा आयोग – नागरीसेवा परिक्षा (UPSC CSE 2022 मध्ये 933 पैकी 617 उमेदवार ठरले पात्र”
“अखिल भारतीय क्रमवारीत पहिल्या 10 उमेदवारात संस्थेच्या 7 जणांची निवड”
“अखिल भारतीय क्रमवारीत पहिल्या 20 उमेदवारात संस्थेच्या 16 जणांची निवड”
“अखिल भारतीय क्रमवारीत पहिल्या 50 उमेदवारात संस्थेच्या मध्ये 39 जणांची निवड”
“अखिल भारतीय क्रमवारीत पहिल्या 100 उमेदवारात संस्थेच्या 72 जणांची निवड”
“भारतातील टॉप यूपीएससी कोचिंग इन्स्टिट्यूटच्या यादीत आम्ही पहिल्या स्थानावर आहोत”
केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाला आढळले आहे की, वाजिराव अँड रेड्डी इन्स्टिट्यूटने त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर यशस्वी उमेदवारांची नावे आणि फोटो ठळकपणे प्रदर्शित केले होते आणि त्याच वेळी विविध प्रकारच्या सशुल्क अभ्यासक्रमांची जाहिरात केली होती. तथापि, केंद्रीय लोकसेवा आयोग नागरी सेवा परीक्षा 2022 मध्ये सदर यशस्वी उमेदवारांनी निवडलेल्या अभ्यासक्रमाबाबतची माहिती वरील जाहिरातीत उघड करण्यात आली नव्हती.
केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाला असेही आढळले आहे की, दावा केलेले सर्व 617 यशस्वी उमेदवार हे केवळ मुलाखत मार्गदर्शन कार्यक्रमात नोंदणीकृत होते. नागरी सेवा परीक्षेच्या अंतिम निवडीमध्ये स्थान मिळवण्यासाठी यशस्वी उमेदवारांनी कोचिंग संस्थेतून घेतलेल्या विशिष्ट अभ्यासक्रमाची माहिती मिळणे हा ग्राहकांचा अधिकार आहे. संभाव्य ग्राहकांना, नागरी सेवा परीक्षेत यश मिळवण्यासाठी निवडलेल्या कोर्सची माहितीपूर्ण निवड करण्यासाठी या माहितीचा हातभार लागत असतो.
प्रत्येक यशस्वी उमेदवाराने निवडलेल्या विशिष्ट कोर्सबद्दलची माहिती जाणूनबुजून लपवत, वाजिराव ॲंड रेड्डी इन्स्टिट्यूटने असे दाखवले की त्यांच्याद्वारे शिकवल्या जाणाऱ्या सर्व कोर्सेसमध्ये ग्राहकांना मिळणाऱ्या यशाचा दर समान आहे, जे योग्य नव्हते. ही तथ्ये संभाव्य विद्यार्थ्यांना त्यांच्यासाठी योग्य असलेले अभ्यासक्रम निवडण्यासाठी महत्त्वाची असल्याने ती जाहिरातीत लपवली जाऊ नयेत.
स्टडीआयक्यू आयएएसने त्यांच्या जाहिरातीत खालील दावे केले आहेत-
“केंद्रीय लोकसेवा आयोग – नागरीसेवा परिक्षा 2023 मध्ये त्यांच्या संस्थेतून प्रशिक्षण घेतलेल्या 120 हून अधिक जणांची निवड”
“यश पक्के ऑफर” आणि “निवड पक्की ऑफर”
ही संस्था सुमारे 60 हून अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण देते. तथापि, केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने संस्थेच्या उत्तराची आणि चौकशी अहवालाची तपासणी केल्यानंतर असे आढळून आले की या 134 पैकी 126 विद्यार्थ्यांनी केवळ मुलाखत मार्गदर्शन कार्यक्रम (IGP) तर 3 विद्यार्थ्यांनी नीतिमत्ता आणि निबंध क्रॅश कोर्समध्ये प्रवेश घेतला होता, 2 विद्यार्थ्यांनी MRP (मुख्य निवासी कार्यक्रम अभ्यासक्रम) मध्ये प्रवेश घेतला होता, 2 विद्यार्थ्यांनी MOCK मध्ये प्रवेश घेतला होता, एका विद्यार्थ्यांने फाउंडेशन, ऑनलाइन MRP, DAF विश्लेषणात प्रवेश घेतला होता. यशस्वी उमेदवारांनी निवडलेल्या अभ्यासक्रमाचे विशिष्ट नाव जाणूनबुजून लपवत स्टडीआयक्यू आयएएसने जाहिरात केलेल्या अभ्यासक्रमांच्या गुणवत्तेबद्दल माहिती नसलेल्या निवडीबद्दल ग्राहकांवर एक दिशाभूल करणारा प्रभाव निर्माण केला, ज्यामध्ये IGP ची अजिबात जाहिरात केलेली नाही.
स्टडीआयक्यू आयएएस “यश पक्के ऑफर” आणि “निवड पक्की ऑफर” हे दावे सिद्ध करण्यासाठी पुरेसे पुरावे देण्यात अयशस्वी ठरले आणि केंद्रीय लोकसेवा आयोग – नागरीसेवा परिक्षा 2023 च्या दावा केलेल्या यशस्वी उमेदवारांचे अर्ज किंवा नोंदणी किंवा नोंदणी फॉर्म आणि शुल्क पावत्या सादर करण्यात देखील अयशस्वी ठरले.
या स्थितीच्या पार्श्वभूमीवर, केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाला अशा खोट्या किंवा दिशाभूल करणाऱ्या जाहिराती आणि अनुचित व्यापार पद्धतींना तोंड देण्यासाठी तरुण आणि प्रभावशाली इच्छुक आणि ग्राहकांच्या हितासाठी दंड आकारणे आवश्यक वाटले.
केंद्रीय लोकसेवा आयोग – नागरीसेवा परिक्षा 2023 च्या निकालांबाबत दिशाभूल करणारे दावे केल्याबद्दल केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने ऐज या संस्थेला 1 लाखाचा दंड ठोठावला आहे. एज आयएएस ने त्यांच्या प्रकाशित जाहिरातीत केंद्रीय लोकसेवा आयोग नागरी सेवा परीक्षा 2023 च्या 13 यशस्वी उमेदवारांचे फोटो आणि नावे ठळकपणे दाखवली होती, परंतु त्यांनी निवडलेल्या अभ्यासक्रमासारखी महत्त्वाची माहिती लपवली होती. केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाला असे आढळून आले की 11 जणांनी मुलाखत मार्गदर्शन कार्यक्रमात (IGP) प्रवेश घेतला होता आणि 2 जणांनी मार्गदर्शन अभ्यासक्रम आणि IGP मध्ये नोंदणी केली होती जी प्राथमिक आणि मुख्य परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतरच लागू होते.
ग्राहक संरक्षण कायदा, 2019 च्या कलम 2(28) (iv) मध्ये दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींची व्याख्या केली आहे, ज्यामध्ये “जाणूनबुजून महत्त्वाची माहिती लपवणे” समाविष्ट आहे. केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने असे निरीक्षण नोंदवले आहे की अनेक कोचिंग संस्था त्यांच्या जाहिरातींमध्ये त्याच यशस्वी उमेदवारांची नावे आणि छायाचित्रे वापरतात आणि त्यांनी निवडलेल्या विशिष्ट अभ्यासक्रमांबद्दलची महत्त्वाची माहिती जाणूनबुजून लपवतात जेणेकरून यशस्वी उमेदवार कोचिंग संस्थेत नियमित वर्गातील विद्यार्थी होते किंवा जाहिरातीत दिल्या जाणाऱ्या अनेक अभ्यासक्रमांचे विद्यार्थी होते अशी फसवी माहिती पसरेल. म्हणूनच, यशस्वी उमेदवारांनी निवडलेल्या विशिष्ट अभ्यासक्रमाची माहिती ग्राहकांना माहिती असणे अत्यंत महत्त्वाचे आहे जेणेकरून त्यांना अभ्यासक्रम आणि कोचिंग संस्था किंवा व्यासपीठावर प्रवेश घेताना माहितीपूर्ण निवड करता येईल.
केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने कोचिंग संस्थांकडून प्रसारित दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींविरुद्ध कारवाई सुरु केली आहे . या संदर्भात, केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने आतापर्यंत दिशाभूल करणाऱ्या जाहिराती प्रसारित केल्याबद्दल विविध कोचिंग संस्थांना 45 नोटिसा बजावल्या आहेत. केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने 22 कोचिंग संस्थांना 71 लाख 60 हजारांचा दंड ठोठावला आहे आणि त्यांना दिशाभूल करणाऱ्या जाहिराती बंद करण्याचे निर्देश दिले आहेत.