विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
केंद्रीय शिक्षण माध्यमिक बोर्ड (सीबीएसई)चा इयत्ता १२वीच्या निकालाबाबत अखेर आज मोठी घोषणा झाली आहे. या निकालाबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. त्याची सुनावणी आज झाली. हा निकाल कशा पद्धतीने आणि कधी लावणार असा सवाल न्यायालयाने बोर्डाला विचारला होता. यासंदर्भात प्रतिज्ञापत्र देण्याचे निर्देशही गेल्यावेळी न्यायालयाने दिले होते. अखेर बोर्डाने निकालाचा फॉर्म्युला न्यायालयास सादर केला. या फॉर्म्युल्यानुसार इयत्ता १० वीतील ३० टक्के गुण, ११वीतील ४० टक्के गुण आणि इयत्ता १२वी तील ४० टक्के गुण अशा प्रकारे ३० ४० ४० अशा तत्वानुसार निकाल लावला जाणार आहे. इयत्ता १२वीच्या घटक परिक्षा, सत्र परिक्षा आणि प्रात्यक्षिक परिक्षा यांचे गुण यासाठी ग्राह्य असणार आहेत. इयत्ता १२वीतील ५ विषयांपैकी ३ विषयातील जे चांगले गुण आहेत ते सुद्धा या निकालात समाविष्ट असतील. तसे, येत्या ३१ जुलै रोजी इयत्ता १२ वीचा निकाल जाहिर केला जाईल, असे बोर्डाने न्यायालयाला सांगितले आहे. कोरोना संकटामुळे यंदा इयत्ता १२ वीची परीक्षा रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे निकाल कधी आणि कसा लागणार असा प्रश्न विद्यार्थी व पालकांना पडला होता. पुढील व्यावसायिक व अन्य शैक्षणिक प्रवेशांसाठी इयत्ता १२ वी चा निकाल महत्त्वाचा असल्याने आता या निकालाबाबत स्पष्टता आली आहे.