अश्विनी कावळे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) नववी, दहावी, अकरावी, बारावी २०२२ -२३ साठी नवा अभ्यासक्रम जारी केला आहे. यात विशेष बाब म्हणजे सीबीएसई दहावी आणि बारावीचा अभ्यासक्रम दोन भागात विभागलेला नाही. याचा सरळ अर्थ असा की सीबीएसई आतापासून दहावी, बारावीच्या परीक्षा दोन टर्ममध्ये घेणार नाही. या वर्गातील विद्यार्थी आणि शिक्षक cbseacademic.nic.in वर भेट देऊन अभ्यासक्रम डाउनलोड करू शकतात.
सीबीएसईच्या अधिकाऱ्यांनी या महिन्याच्या सुरुवातीला सांगितले होते की बोर्ड पुढील वर्षापासून फक्त एकदाच परीक्षा घेईल. दोन भागांच्या परीक्षा पद्धतीअंतर्गत, पहिली टर्म बोर्ड परीक्षा गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये झाली होती आणि दुसरी टर्म बोर्ड परीक्षा २६ एप्रिलपासून सुरू होत आहे. गेल्या दोन वर्षांपासून अभ्यासक्रमात ३० टक्के कपात करण्यात आली आहे. आता हा अभ्यासक्रम केवळ प्री-कोविड स्तरावर ठेवण्यात आला आहे. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, भूगोल, मानसशास्त्र या व्यावहारिक विषयांचा वार्षिक पेपर ७० गुणांचा असेल. ३० गुणांचे प्रॅक्टिकल असेल. भाषेचा पेपर ८० गुणांचा आणि अंतर्गत मूल्यमापन २० गुणांचा असेल. बोर्डाने प्रत्येक विषयाचा संपूर्ण अभ्यासक्रम आणि गुणांकन योजना वेबसाइटवर प्रसिद्ध केली आहे. बोर्ड भविष्यातही दोन टर्म परीक्षेचा सराव सुरू ठेवेल, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र बोर्डाने एकच अभ्यासक्रम जारी केला असून पुढील वर्षापासून परीक्षा एकदाच घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
महामारीमुळे मंडळाने दोन टर्म परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला होता. महामारीच्या कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी दोन वेळा परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला, त्यात असे सांगण्यात आले की, एकदा परीक्षा न घेतल्यास मागील परीक्षेच्या गुणांवरून निकाल जाहीर केला जाईल. जरी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०नुसार दोन टर्म परीक्षा असाव्यात, परंतु बोर्डाने आता निर्णय घेतला आहे की पूर्वीच्या बोर्डाप्रमाणेच परीक्षा घेण्यात येतील.