विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
परीक्षांचे नियोजन गेल्या वर्षभरापासून चांगलेच बिघडले आहे. अशात सर्व केंद्र व राज्य सरकारांनी १० वीच्या परीक्षेला बायपास केल्यामुळे भविष्याची चिंता वाढलेली आहे. पण सीबीएसई १२ वीची परीक्षा होणार आहे आणि तारखा जाहीर झाल्यावरही विद्यार्थ्यांना तयारीसाठी जवळपास दीड महिना मिळणार आहे. जुलैच्या अखेरीस ही परीक्षा सुरू होईल आणि १५ ऑगस्टपूर्वी आटोपती घेतली जाईल, असे संकेत केंद्रीय शिक्षण मंडळाने दिले आहेत.
कोरोनामुळे देशातील वातावरण खराब झाले आहे. तिसरी लाटही मुलांच्या जीवाला धोका पोहोचविणारी असू शकते, असे भाकित तज्ज्ञांनी वर्तवले आहे. त्यामुळे सीबीएसई बारावीची परीक्षा झाली तरीही ती पूर्ण विषयांसाठी होणार नाही. केवळ मुख्य विषयांचे पेपर्स घेतले जातील. इतर विषयांना सरासरीच्या आधारावर गुण दिले जातील, अशी योजना आहे.
परीक्षा तीन तास चालेल की एक तास हेदेखील अद्याप स्पष्ट झालेले नाही. काही दिवसांपूर्वी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत झालेल्या सर्व राज्यांच्या बैठकीत परीक्षेसाठी दोन पर्याय सूचविले होते. राजनाथ सिंह यांनी हे दोन्ही पर्याय सर्व राज्यांपुढे ठेवले आहेत. त्यातील एक पारंपरिक अर्थात तीन तासांची प्रश्नपत्रिका असेल. तर दुसरे म्हणजे पर्यायवाचक प्रश्नपत्रिका असेल आणि परीक्षा केवळ दीडच तास चालेल.
यापैकी कुठल्याच पर्यायावर शिक्कामोर्तब झालेले नाही. बहुतांश राज्यांनी मात्र दुसऱ्या म्हणजेच दीड तासाच्या पर्यायाला पसंती दिली आहे. गुरुवारी देखील या सर्व विषयांवर दीर्घकाळ चर्चा झाली. त्यानुसार आता रोडमॅप तयार करण्यात आला असून त्याला अंतिम स्वरुप आलेले आहे. परंतु, पंतप्रधान कार्यालयातून परवानगी मिळाल्यावरच पुढील निर्णय होणार आहे.