नवी दिल्ली – केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड (CBSE)च्या इयत्ता १०वी आणि १२वीच्या लेखी परीक्षा ४ मे पासून सुरू होणार असून त्या १० जूनपर्यंत संपतील. तर १ मार्च पासून प्रॅक्टीकल परिक्षा सुरू होतील, अशी घोषणा केंद्रीय शिक्षणमंत्री डॉ. रमेश पोखरियाल निशंक यांनी केली आहे. तसेच, १५ जुलैला या परीक्षांचा निकाल लागेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.
परीक्षांच्या तारखांची घोषणा करण्यासाठी त्यांनी ऑनलाईन संवाद साधला. तारखा जाहिर झाल्याने शिक्षक, विद्यार्थी व पालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे यापुढील काळात परीक्षांचे योग्य नियोजन आणि त्यादृष्टीने अभ्यास करणे विद्यार्थ्यांना शक्य होणार आहे. इतिहासात पहिल्यांदाच या परीक्षा फेब्रुवारी आणि मार्चमध्ये होणार नाहीत.
कोरोनामुळे सध्या ऑनलाईन क्लासेस सुरू आहेत. दरवर्षी या परीक्षा फेब्रुवारी-मार्च महिन्यात होतात. यंदाही तेव्हाच कशा घेतल्या जाणार, असा प्रश्न उपस्थित केला जात होता. तसेच, पालकांनी त्यास विरोध केला होता. त्यामुळे शिक्षणमंत्र्यांनी बोर्डाचे शिक्षक तसेच पालक यांच्याशी चर्चा केली. त्यांची मते जाणून घेतली. यासंदर्भात ३१ डिसेंबर रोजीच परीक्षांच्या तारखांची घोषणा करण्याचे शिक्षण मंत्र्यांनी जाहिर केले होते.
शिक्षणमंत्र्यांकडून कौतुक
शिक्षणमंत्री पोखरियाल म्हणाले की, कोरोना काळाचे मोठे आव्हान होते. मात्र, विद्यार्थी, शिक्षक, पालक या सर्वांनीच या आव्हानाला तोंड दिले. ऑनलाईन शिक्षण देणे किंवा घेणे हे एवढे सोपे नव्हते. सर्वांच्या अथक प्रयत्नामुळेच हे शक्य झाले. मी सर्वांचे आभार मानतो. वारंवार संवाद केल्यानेच हे यश आले आहे. विद्यार्थ्यांच्या संयमालाही महत्व द्यायला हवे. कुणीही खचले नाही. सर्व जण सकारात्मक आहेत. जग किंवा काही देश विचारही करु शकत नाही, असे काम कोरोना काळात विद्याद्यानाचे आपण करुन दाखविले आहे. जे व्यक्ती ऑनलाईन शिक्षण घेऊ शकत नाही. त्यांच्यासाठी आपण व्यवस्था केली. त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले, असेही पोखरियाल म्हणाले. सर्व जण एकत्र आले आणि एका ध्येयाने आपण प्रयत्न केल्याने हे यश आले. जेईई आणि नीटच्या परीक्षा शांततेत आणि सुरक्षेत संपन्न झाल्या. ही सुद्धा एक मोठी बाब आहे, असेही त्यांनी सांगितले.