नवी दिल्ली – बारावीच्या प्रॅक्टिकल परीक्षेच्या तारखा सेंट्रल बोर्ड ऑफ सेकेंडरी एज्यूकेशन (CBSE) ने नुकत्याच जाहीर केल्या आहेत. सीबीएसईने दिलेल्या माहितीनुसार, १ जानेवारी ते ८ फेब्रुवारी २०२१ दरम्यान या प्रॅक्टिकल परीक्षा घेण्यात येणार आहेत. दरम्यान, सीबीएसईच्या वतीने या तारखा संभाव्य असल्याचेही सांगण्यात येत आहे.
अधिकृत वेबसाईटवर माहिती आणि वेळापत्रक लवकरच प्रसिद्ध केले जाणार असल्याचे सेंट्रल बोर्ड ऑफ सेकेंडरी एज्युकेशनने म्हटले आहे. कोरोना महामारीमुळे शैक्षणिक वर्ष उशिरा सुरु झाल्याने यंदा परीक्षा उशिरा होणार असल्याचा संभ्रम विद्यार्थ्यांमध्ये होता. मात्र सीबीएसईतर्फे याबाबत प्राथमिक माहिती देण्यात आली आहे. तसेच सध्या कॉलेज बंद असल्याने अभ्यासक्रम ऑनलाईन पद्धतीने होणार असल्याचे बोर्डाने म्हटले आहे.
बोर्डाने प्रॅक्टिकल परीक्षा घेण्यासंदर्भातील नियमावली जाहीर केली आहे. ज्यामध्ये प्रॅक्टिकल परीक्षांसाठी एक ऑब्जर्वर देखील नेमण्यात येणार आहे. गेल्यावर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षीही प्रॅक्टिकल परीक्षांमध्ये इंटरनल आणि एक्सटर्नल असे दोन्हीही परीक्षक असणार आहेत. तसेच प्रॅक्टिकल परीक्षा सीबीएसई बोर्डाने नियुक्त केलेल्या या एक्सटर्नल एग्झामिनर्सकडूनच घेण्याची जबाबदारी संबंधित कॉलेजची असेल असे स्पष्ट करण्यात आले आहे.