नवी दिल्ली – या वर्षी सीबीएसई बोर्डाच्या १० वी आणि १२ वीच्या विद्यार्थ्यांना गुण वाढवण्याची संधी मिळणार आहे. बोर्डानं या शैक्षणिक वर्षात कंपार्टमेंट पेपरची सुविधा देण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी जुन्या नियमांनुसार, कोणत्याही विषयात पास होण्यासाठी विद्यार्थ्यांना इम्प्रूव्हमेंट पेपर देण्यासाठी एक वर्ष वाट पाहावी लागत होती. हा नवीन नियम राष्ट्रीय शिक्षण धोरणाचा हा भाग आहे. यामध्ये सीबीएसई बोर्डाची परीक्षा देणार्या विद्यार्थ्यांना चांगले गुण मिळवण्याची संधी देण्यात येणार आहे.
सीबीएसई बोर्डातर्फे सांगण्यात आलं, की विद्यार्थ्यांना कंपार्टमेंट परीक्षा द्यावी लागेल. ही परीक्षा मुख्य परीक्षेनंतर आयोजित केली जाईल. निकाल लागल्यानंतर कंपार्टमेंट परीक्षा देणार्या विद्यार्थ्यांच्या दोन्ही परीक्षांमधील ज्यामध्ये चांगले गुण असतील, ते निकालात गृहित धरले जातील.
जे विद्यार्थी आपले गुण सुधारतील, त्यांची एकत्रित गुणपत्रिका जारी केली जाईल. जर दोनपेक्षा त्याहून अधिक विषयातील गुणांमध्ये सुधारणा करू इच्छित असतील तर त्यांना पूर्ण वर्ष वाट पाहावी लागणार आहे. त्या विद्यार्थ्यांची परीक्षा पुढील बॅचसोबत आयोजित केली जाईल. हा नियम बोर्ड परीक्षा २०२१ पासून लागू होईल.
कोरोना महामारीमुळे वर्षभर शाळा बंद राहिल्यानं विद्यार्थ्यांचा तणाव दूर करण्यासाठी सीबीएसईनं सर्व विषयांचा अभ्यासक्रम ३० टक्के घटविण्याचा निर्णय घेतला आहे. त्याशिवाय या वर्षी परीक्षेमध्ये १० टक्क्यांहून अधिक पर्यायी प्रश्न विचारले जाणार आहेत.