मुंबई – राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरासह अन्य मालमत्तांवर केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय)ने छापे टाकल्याचे वृत्त आहे. माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी देशमुख यांच्यावर १०० कोटी रुपये वसुलीचा आरोप केला होता. याप्रकरणी सीबीआयने देशमुख यांची चौकशी केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून सीबीआयने हे छापे टाकल्याचे समजते. या छाप्यांमुळे राज्यात एकच खळबळ उडाली असून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या प्रकरणाची दखल घेत राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील हे तत्काळ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी पोहचले आहेत. देशमुख हे सध्या नागपुरात असल्याचे समजते. सीबीआयने किती ठिकाणांवर छापे टाकले आणि तेथे काय मिळाले, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.