नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आदिवासी विकास विभागातील एक्झिक्युटिव्ह इंजिनिअरला तब्बल २८ लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आल्याचे प्रकरण ताजे असतानाच आता आणखी एक धक्कादायक वृत्त समोर आले आहे. केंद्रीय अन्वेषण ब्युरो अर्थात सीबीआयनेही नाशिकमध्ये मोठी कारवाई केल्याचे वृत्त आहे. खास म्हणजे, सीबीआयच्या जाळ्यात मोठा अधिकारी गळाला लागला आहे. सीजीएसटी कार्यालयातील सुप्रिटेंडंट चंद्रकांत चव्हाणके असे या अधिकाऱ्याचे नाव आहे. नाशिकमध्ये सीबीआयने कार्यालय सुरू केले आहे. या कार्यालयाची ही पहिलीच आणि अतिशय मोठी कारवाई आहे.
नाशिकमध्ये गेल्या काही दिवसांपासून सातत्याने लाचखोरीच्या घटना घडत आहेत. राज्य सरकारच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) दोन सापळे रचले होते. त्यात एक सापळा दिंडोरी तहसिल कार्यालयात होता. तेथील मंडळ अधिकाऱ्याला १० हजाराची लाच घेताना पकडले आहे. तर, नाशकात आदिवासी विकास विभागाचा एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर दिनेशकुमार बागुल सापडला आहे. २ कोटी रुपयांच्या कामासाठी तब्बल १२ टक्के या लाच बागुलने मागितली. त्यापोटी तब्बल २८ लाख रुपये त्याने त्याच्याच घरी कंत्राटदाराकडून घेतले. आणि तो सापळ्यात अडकला. बागुलकडे मोठी माया असल्याचे वृत्त असतानाच आता सीबीआयनेही नाशकात मोठी कारवाई केली आहे.
सीबीआयच्या वरिष्ठ सूत्रांनी इंडिया दर्पणला दिलेल्या माहितीनुसार, नाशिकमधील वस्तू व सेवा कर विभागाचे कार्यालय आहे. एक राज्य सरकारचे आहे तर दुसरे केंद्र सरकारचे. यातील केंद्र सरकारच्या सीजीएसटी कार्यालयावर सीबीआयने धाड टाकली. या कारवाईमध्ये सीजीएसटी विभागाचा सुप्रिटेंडंट चंद्रकांत चव्हाणके सीबीआयच्या हाती लागला आहे. या सुप्रिटेंडंटने नक्की किती लाच घेतली, कुठे घेतली, कुणाकडून आणि कशासाठी घेतली हे अद्याप समोर आलेले नाही. मात्र, लाचेचा आकडा मोठा असल्याचे सांगितले जात आहे. यासंदर्भात सीबीआयकडून आज सायंकाळीच सविस्तर माहिती दिली जाणार आहे.
https://twitter.com/IndiaDarpanLive/status/1563107635963957248?s=20&t=R9YNNdtu8XoDbdYkALBv_A
CBI Raid in Nashik GST Department Officer Trap