नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आदिवासी विकास विभागातील एक्झिक्युटिव्ह इंजिनिअरला तब्बल २८ लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आल्याचे प्रकरण ताजे असतानाच केंद्रीय अन्वेषण ब्युरो अर्थात सीबीआयनेही नाशिकमध्ये कारवाई केली. सीबीआयच्या जाळ्यात केंद्रीय जीएसटी कार्यालयातील सुप्रिटेंडंट चंद्रकांत चव्हाणके सापडला. त्याला सीबीआयने अटक केली असून त्याला उद्या नाशिकच्या न्यायालयात हजर केले जाणार आहे. नाशिकमध्ये सीबीआयने कार्यालय सुरू केल्यानंतर ही पहिलीच कारवाई आहे.
सीबीआयचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रणजीत कुमार पांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, नाशिकमध्ये वस्तू व सेवा कर (जीएसटी) विभागाची दोन कार्यालये आहेत. यातील एक राज्य सरकारचे आहे तर दुसरे केंद्र सरकारचे. यातील केंद्र सरकारच्या सीजीएसटी कार्यालयावर सीबीआयने धाड टाकली. या कारवाईमध्ये सीजीएसटी विभागाचा सुप्रिटेंडंट चंद्रकांत चव्हाणके हा सीबीआयच्या हाती लागला आहे. हे कार्यालय सिडकोतील अंबड लिंक रोड येथे आहे.
चव्हाणके लाच मागत असल्याबाबत तक्रारी सीबीआयकडे प्राप्त झाली. चव्हाणके याच्याकडे निफाड परिसराची जबाबदारी आहे. जीएसटी कर चोरी संदर्भातील शहानिशा आणि प्रकरणांची हाताळणीचे काम चव्हाणके करतो. एका व्यावसायिकाचा जीएसटी नंबर रद्द करण्यासाठी चव्हाणकेने १० हजार रुपयांची लाच मागितली होती. तडजोडी अंती ८ हजार रुपये निश्चित झाले. यच प्रकरणाची तक्रार सीबीआयच्या मुंबई कार्यालयाकडे आली. त्यानंतर सीबीआयचे पथक मुंबईहून नाशकात आले. त्यांनी सापळा रचला. चव्हाणकेवर अतिशय बारकाईन लक्ष ठेवले. ही पाळत अतिशय अचूक असल्यानेच तो सीबीआयच्या जाळ्यात सापडला. चव्हाणकेला सीबीआयच्या पथकाने अटक केली आहे. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला उद्या नाशिक न्यायालयात हजर केले जाणार आहे. चव्हाणकेची सध्या कसून चौकशी सुरू आहे.
दरम्यान, लाच देणे आणि घेणे गुन्हा आहे. याप्रकरणी सीबीआयकडे तक्रार करण्यासाठी 8433700000 किंवा 022-26543700 या नंबरवर संपर्क साधावा. किंवा [email protected] या इमेल आयडीवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
CBI Raid in Nashik CGST Superintendent Bribe Trap